फ्रान्समधील नोट्रो-डेम डे पॅरिस चर्च जगातील सर्वात प्रसिद्ध आणि जुन्या चर्चपैकी एक आहे. ८०० वर्षे जुन्या चर्चमध्ये एक अशी गोष्ट ठेवलेली आहे जी तब्बल दोन हजार वर्षे जुनी आहे. तसेच ती ख्रिश्चन समजासाठी बहुमूल्य आहे. हजारो वर्षांपासून राजेरजवाडे प्राणांची बाजी लावून या वस्तूचं संरक्षण करत आहेत. या मौल्यवान वस्तूचं नाव आहे क्राऊन ऑफ थोर्न्स, म्हणजेच काटेरी मुकूट.
असं म्हणतात की, रोमन सैनिकांनी जेव्हा येशू ख्रिस्तांना सुळावकर चढवलं तेव्हा त्यांच्या डोक्यावर हाच काटेरी मुकूट ठेवण्यात आला होता. क्राऊन ऑफ थोर्न्स ला एका गोलाकार काचेमध्ये सुरक्षित ठेवण्यात आलं आहे. तसेच त्यावर सोनेरी नक्षीकाम केलेलं आहे. त्याखाली एक मखमली उशी ठेवण्यात आली आहे. या मुकुटाच्या सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवलेला असतो.
दर वर्षी गुडफ्रायडे दिवशी क्राऊन ऑफ थोर्न्स सर्वसामान्य जनतेला पाहण्यासाठी ठेवला जातो. त्यावेळी जगभरातून लाखो लोक त्याला पाहण्यासाठी पॅरिसमध्ये येतात.
२०१९ मध्ये या चर्चला भीषण आग लागली होती. त्यामध्ये जवळपास संपूर्ण चर्च जळून खाक झालं होतं. तेव्हा प्रयत्नांची शर्थ करून क्राऊन ऑफ थोर्न्स ला वाचवण्यात आले होते. त्यानंतर काही दिवस तो हॉटेल वाइलमध्ये ठेवण्यात आला होता. नंतर या चर्चच्या दुरुस्तीचं काम पूर्ण झाल्यानंतर तो पुन्हा इथे आणण्यात आला.