नैरोबी - केनिया सरकारने लाल चोच असलेला चिमुकला पक्षी क्वेलिया विरोधात व्यापक मोहिमी उघडली आहे. त्याअंतर्गत सरकारने ६० लाख पक्षी मारण्याचं लक्ष समोर ठेवलं आहे. हा जगातील सर्वाधिक संख्या असलेला पक्षी आहे. त्याला पंख असलेले टोळ म्हणून ओळखळे जाते. क्वेलिया नेहमी झुंडीने राहतो. तसेच त्यांच्या समुहामध्ये तीन कोटींहून अधिक पक्षी असतात. हे चिमुकले पक्षी गहू, तांदूळ, सूर्यफूल आणि मका यासारख्या पिकांवर ताव मारतो. त्यामुळे या पक्षांना मोठ्या प्रमाणावर मारण्यासाठी मोहीम आखण्यात आली आहे.
हॉर्न ऑफ आफ्रिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोमालिया, इथिओपिया, इरिट्रिया, जिबुटी, सुदान, केनिया आणि दक्षिण सुदान या आफ्रिका खंडातील पूर्वेकडील देशांमध्ये भीषण दुष्काळ पडला आहे. दुष्काळामुळे लाखो लोकांवर उपासमारीचं संकट घोंघावत आहे. भीषण दुष्काळामुळे गवताची मैदाने पूर्णपणे नष्ट होत चालली आहेत. या गवतांच्या बिया हे क्वेलिया पक्षांचं मुख्य भोजन आहे. मात्र गवतच नष्ट होत असल्याने हा पक्षी शेतातील पिकांवर आक्रमण करत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार केनियामध्ये या पक्ष्यांनी केनियामध्ये आतापर्यंत ३०० एकरवरील भातपिक गिळंकृत केले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या हवाल्याने काही वृत्तसंस्थांनी सांगितले की, २० लाख क्वेलिया पक्षांचा थवा एका दिवसामध्ये ५० लाख टन अन्नपदार्थ खाऊ शकतो. पश्चिम केनियामध्ये या पक्ष्यांमुळे शेतकऱ्यांच्या सुमारे ६० टन अन्नधान्याचं नुकसान झालं आहे. त्यामुळेच या पक्षांना मारण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे.