अंताक्या (तुर्की) : तुर्कीतील भूकंपानंतर पाच दिवसांपासून म्हणजे १२९ तासांपासून पडलेल्या घरामध्ये अडकलेल्या एका कुटुंबातील पाचजणांना बचाव पथकाने सुरक्षित बाहेर काढले आहे. तुर्की, सीरियातील मृतांची संख्या २५ हजारांच्या जवळ पोहोचली आहे, तर जखमी लोकांची संख्या ८० हजार आहे. या बचाव पथकाने गाझियानटेप प्रांतातील नुरदाग या शहरातून एका इमारतीच्या ढिगाऱ्याखालून एक महिला आणि तिची मुलगी हव्वा, फातमागुल अस्लान यांना बाहेर काढले. त्यानंतर ही टीम या मुलीचे वडील हसन अस्लान यांच्यापर्यंत पोहोचली. परंतु ते म्हणाले की, माझी दुसरी मुलगी झेनेप आणि मुलगा साल्टिक बुग्रा यांना अगोदर वाचवा. या सर्वांना पथकाने बाहेर काढल्यानंतर त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
तुर्कीत अनेक ढिगाऱ्याखाली कोणी जिवंत सापडण्याची आशा कमी होत असताना ही घटना अपेक्षा उंचावणारी आहे.
तुर्कस्तानच्या भूकंपात एका भारतीयाचा मृत्यू
तुर्कस्तानमधील भूकंपानंतर बेपत्ता असलेला विजयकुमार गौड याचा मृतदेह शोधपथकाला सापडला आहे. तो ज्या हॉटेलमध्ये राहत होता, ती इमारत भूकंपामुळे कोसळली हाेती. विजयकुमारचा चेहरा विद्रूप झाला असून त्यामुळे हातावरील ओम या अक्षराच्या टॅटूवरून त्याची ओळख पटविण्यात आली. तो उत्तराखंडमधील मूळ रहिवासी असून, बंगळुरूच्या एका कंपनीत तो नोकरी करत होता. कंपनीच्या कामासाठी तो तुर्कस्तानला आला होता.