इस्लामाबादः पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये एक हजार वर्षं जुनं ऐतिहासिक हिंदू मंदिर हिंदू भाविकांसाठी खुलं केलं आहे. जे गेल्या 72 वर्षांपासून बंदावस्थेत होतं. अधिकाऱ्यांच्या मते, स्थानिक हिंदू समुदायाच्या मागणीवरून फाळणीनंतर हे मंदिर पूजेसाठी खुलं करण्यात आलं आहे. दिवंगत इतिहासकार राशीद रियाज यांचं पुस्तक हिस्ट्री ऑफ सियालकोटनुसार, शहरातल्या रहदारी असलेल्या धौरावल भागात स्थित असलेलं हे शावला तेज सिंह मंदिर एक हजार वर्षं जुनं आहे.पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांच्या धार्मिक स्थळांची देखभाल करणारे ईटीपीबीचे प्रवक्ते आमिर हाशमी यांच्या मते, हिंदू समुदायाच्या मागणीनंतर लाहोरपासून जवळपास 100 किलोमीटर दूरवर असलेलं हे मंदिर भाविकांसह पूजा करण्यासाठी उघडं करण्यात आलं आहे. पहिल्यांदा या शहरात हिंदूंची लोकसंख्या फार नव्हती म्हणून हे मंदिर पूजेसाठी बंद करण्यात आलं होतं. 1992मध्ये भारतात बाबरी मशीद प्रकरणानंतर पाकमध्ये हिंदूंच्या मंदिरांवर हल्ला चढवण्यात आला होता. या हल्ल्यात शावला तेज सिंह मंदिराचंही नुकसान झालं होतं. ईटीपीबी बोर्डाचे अध्यक्ष डॉ. अमीर अहमद यांच्या निर्देशानुसार मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम करत आहे.स्थानिक हिंदू नेते रतनलाल आणि रुमिश कुमार यांनी हे मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यासाठी सरकारनं उचललेल्या पावलाचं स्वागत केलं आहे. ईटीपीबीच्या मते, मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम अद्यापही सुरूच आहे. लवकरच ते काम पूर्ण होणार आहे. या भागात जवळपास दोन हजार हिंदूंची लोकसंख्या आहे. त्यामुळे हिंदूंना आपलं धार्मिक स्थळ पूजा करण्यासाठी खुलं झाल्याने ते फार खूश आहेत. तसेच भारतातून आलेल्या हिंदूंनाही या मंदिरात जाऊन दर्शन घेता यावं, यासाठी पाकिस्तान सरकार प्रयत्नशील आहे.
पाकमध्ये हजारो वर्षं जुनं बंदावस्थेतील ऐतिहासिक मंदिर 72 वर्षांनंतर हिंदूंसाठी खुलं
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 8:59 AM