बीजिंग : वायव्य चीनमधील हजारो नागरिक विषाणू संसर्गाने होणाऱ्या ब्रुसेलोसिस या आजाराने ग्रस्त असून, त्यामुळे त्यातील काही जणांची जननक्षमता कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या आजाराचे विषाणू एका प्रयोगशाळेतील अपघातानंतर हवेत मिसळल्याने त्याची साथ आली असल्याची कबुली चिनी अधिकाऱ्यांनी दिली आहे.चिनी सरकारचे मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्समध्ये यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध झाले आहे. गान्सू प्रांताची राजधानी लांझोऊच्या आरोग्य समितीने म्हटले आहे की, या प्रांतातील ३,२४५ लोकांना ब्रुसेलोसिसचा आजार झाल्याचे वैद्यकीय तपासणीतून निष्पन्न झाले आहे.प्राण्यांतून ब्रुसेला हा विषाणू माणसात संक्रमित होऊन हा आजार होतो. त्यामुळे पुरुषांच्या अंडकोषांना सूज येण्याची शक्यता असते. तसेच हा आजार जडलेल्यांपैकी काही जणांची जननक्षमता नष्ट होण्याचा धोका संभवतो. या आजाराबद्दल अमेरिकेच्या सेंटर्स फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन या संस्थेने म्हटले आहे की, ब्रुसेलोसिस या आजाराला माल्टा फिव्हर किंवा मेडिटेरनिअन फिव्हर, असेही नाव आहे.सुदैवाने एकही बळी नाहीलांझोऊ प्रांतात ब्रुसेलोसिस आजाराने ग्रस्त असलेले रुग्ण शोधून काढण्यासाठी २१ हजार जणांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. या आजारामुळे अद्याप सुदैवाने एकाचाही बळी गेलेला नाही. चीनने ब्रुसेलोसिसने आजारी असलेल्यांच्या तपासणीसाठी लांझोऊ प्रांतात मोठी मोहीम उघडली आहे. ज्यांना हा आजार झाला आहे, त्यांना उपचारांसाठी त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. या साथीचा फैलाव अन्य प्रांतात होऊ नये म्हणून चीनने विशेष दक्षता बाळगली आहे.
चीनमधील हजारो नागरिक ब्रुसेलोसिस आजाराने ग्रस्त, जननक्षमता कमी होण्याचा धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 12:44 AM