कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. आजवर या महामारीमुळे ५८ लाखांपेक्षा अधिक लोक आजारी पडले आणि साडेतीन लाखांपेक्षा जास्त लोकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनाच्या बळींचा आकडा अपेक्षेपेक्षा जास्त आहे. यामुळे अवघ्या जगाने कोरोनावर लक्ष केंद्रीत केले आहे. या जागतिक महामारीला रोखण्यात महासत्ता असलेली अमेरिकाही अपयशी ठरली आहे.
चीनच्या वुहानमध्ये सुरु झालेल्या या महामारीमुळे जगाचे कंबरडे मोडले आहे. त्यात अमेरिकेचे अधिकारी चीनला शिक्षा कशी देता येईल यावर विचार करत आहेत. विविध मार्गांनी चीनला कशारितीने धडा शिकवता येईल, यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.
कोरोनाचा उद्रेक हा अमेरिकेत सर्वाधिक झालेला आहे. यामुळे त्रस्त झालेल्या ट्रम्प प्रशासनाने चीनला परिणाम भोगण्यास तयार राहण्याची धमकी वेळोवेळी दिली आहे. चीनचे कर्जही परत करणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. यानंतर आता चीनच्या विद्यार्थ्यांना लक्ष्य करण्यात आले असून त्यांना दिलेले व्हिसा मागे घेण्याच्या विचारात प्रशासन आहे. अमेरिकेत शिक्षण घेणारे पदवीधर विद्यार्थी आणि संशोधकांचा यामध्ये समावेश आहे.
चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे अमेरिकेतील काही मान्यताप्राप्त विद्यापीठांशी करार आहेत. आता या विद्यार्थ्यांना अमेरिकेतून हद्दपार करण्याची तयारी सुरू आहे. टाईम्सच्या वृत्तानुसार, काही प्रवर्गातील चीनच्या विद्यार्थ्यांवर प्रथम बंदी घातली जाईल. यानंतर, शिक्षणावर निर्बंध लादले जाऊ शकतात. त्यामुळे अभी तो बस शूरूवात है आगे आगे देखो होता है क्या असा पवित्रा घेतलेला अमेरिका चीनची पुरती वाट कशी लावणार हे पाहावे लागणार आहे.