बाऊल्डर क्रिक (कॅलिफोर्निया) : अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील जंगलात भडकलेल्या भीषण आगीमुळे सॅन फ्रान्सिस्को बे एरिया भागातील हजारो नागरिकांना आपली घरे सोडून सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे लागले आहे.वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दशकांमधील सर्वाधिक भीषण ‘विद्युत वादळा’मुळे (लायटनिंग स्टॉर्म) ही आग भडकली आहे. या वादळामुळे या आठवड्यात सुमारे ११ हजार विजा कोसळल्या असून, ३७0 ठिकाणी आग लागली आहे. आगीमुळे शेकडो किलोमीटरपर्यंत धूर पसरला असून, हवा प्रचंड प्रदूषित झाली आहे. आग विझविण्याची साधनसामग्री तोकडी पडली आहे.जंगलातील आगीवर नियंत्रण मिळविण्याची जबाबदारी असलेल्या ‘कॉलफायर’ने दिलेल्या माहितीनुसार, सॅन फ्रान्सिस्कोच्या दक्षिणेला सॅन माटेओ आणि सांता क्रूझ काऊंटींमध्ये १६,१८७ हेक्टरवर आग पसरली आहे. त्यात तीन जण जखमी झाले आहेत. येथून २२ हजार जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. २0 बांधकामे आगीत उद्ध्वस्त झाली आहेत. कॅलिफोर्नियातील सर्वाधिक जुने संरक्षित जंगल बिग बेसिन रेडवूड स्टेट पार्कमध्ये आगीने मोठे नुकसान झाले आहे. या जंगलात २ हजार वर्षे जुनी रेडवूडची झाडे आहेत. असंख्य झाडे भस्मसात झाली. एक ऐतिहासिक इमारतही भस्मसात झाली.
कॅलिफोर्नियाच्या जंगलातील भीषण आगीमुळे हजारो नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 2:27 AM