कीव्ह : युक्रेनच्या पूर्वभागात जोरदार हल्ले चढविण्यासाठी रशिया सज्ज झाला आहे. त्या परिसरात रशियाने मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात केल्याची उपग्रहांनी छायाचित्रे सोशल मीडियावर झळकली आहेत. युक्रेन लष्कराच्या ३६व्या मरिन ब्रिगेडच्या १०२६ नौसैनिकांनी शरणागती पत्करल्याचा दावा रशियाने केला आहे.
रशियाने कीव्ह परिसरातून आपले सैन्य मागे घेतल्यानंतर तो भाग पुन्हा युक्रेनच्या ताब्यात गेला. कीव्हचा परिसर, बुका आदी ठिकाणी रशियाच्या सैनिकांनी ठार केलेल्या शेकडो युक्रेनियन नागरिकांचे मृतदेह सापडले. रशियाने केलेल्या या युद्ध गुन्हेगारीची आंतरराष्ट्रीय यंत्रणांमार्फत चौकशी करावी, अशी मागणी युक्रेनने केली होती.
रशियाकडून होतोय युक्रेनमध्ये नरसंहार : जो बायडेन- रशिया युक्रेनमध्ये नरसंहार घडवत असल्याचा आरोप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केला आहे. - युक्रेन जगाच्या नकाशावरून नष्ट व्हावा याकरिताच पुतिन प्रयत्न करत आहेत, असा दावाही त्यांनी केला. -बायडेन म्हणाले की, रशियाच्या सैनिकांनी युक्रेनमध्ये प्रचंड अत्याचार केले आहेत. त्याच्या कहाण्या आता हळूहळू उजेडात येत आहेत.
रशियावरील निर्बंध कायम राहावेत : जेलेन्स्कीयुक्रेनवर आक्रमण करणाऱ्या रशियावर पाश्चिमात्य देशांनी लादलेले निर्बंध बराच काळ कायम राहावेत, अशी अपेक्षा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की यांनी व्यक्त केली आहे. युद्धाच्या काळात अमेरिका व इतर देश आम्हाला जी मदत करत आहेत, त्यासाठी आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो.