बगदाद : इराकमध्ये सुन्नी बंडखोरांनी मोसूल शहरासह देशातील सुन्नीबहुल भागावर कब्जा करण्यासह राजधानी बगदादकडे आगेकूच सुरू केल्यामुळे पंतप्रधान नूरी अल मलिकी यांच्या सरकारसमोर गंभीर संकट निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे बंडखोर वेगाने पुढे सरकत असताना सरकारला आतापर्यंत प्रत्युत्तरादाखल एकही ठोस कारवाई करता येऊ शकलेली नाही. दरम्यान, इराकी सरकारने शुक्रवारी राजधानीच्या संरक्षणासाठी सज्जता वाढविली आहे. २०११ मध्ये अमेरिकी सैन्य परतल्यानंतर इराकच्या स्थैर्याला निर्माण झालेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा धोका मानला जात आहे. यामुळे इराकची सुन्नी, शिया आणि कुर्द अशी फाळणी होण्याचीही भीती व्यक्त होत आहे. इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड लेवांटच्या बंडखोरांनी गुरुवारी इराकची राजधानी बगदादकडे कूच केले. सद्दाम हुसैन राजवटीचे अनेक समर्थक आणि इतर सुन्नी असंतुष्टही त्यांना येऊन मिळाले आहेत. (वृत्तसंस्था)