हिंदू धर्मगुरू आणि इस्कॉनचे माजी प्रमुख चिन्मय कृष्ण दास ब्रह्मचारी यांच्या अटकेवरून बांगलादेशात खळबळ उडाली आहे. यावर भारतानेही तीव्र प्रतिक्रिया दिली असून, बांगलादेशनेही त्याला प्रत्युत्तर दिले आहे. दरम्यान, बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारमधील युवा आणि क्रीडा मंत्रालयाचे सल्लागार आसिफ महमूद शोजीब भुईया यांनी म्हटले आहे की, चिन्मय दास यांना हिंदू समाजाचा नेता म्हणून नाही तर देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.
मंगळवारी एका कार्यक्रमात बोलताना आसिफ महमूद म्हणाले, 'बांगलादेशच्या सार्वभौमत्वाला आणि स्वातंत्र्याला धोका निर्माण करणाऱ्या देशद्रोहाच्या कोणत्याही कृतीवर सरकार कठोर कारवाई करेल. आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की अशा कारवायांमध्ये सहभागी असलेल्या कोणत्याही व्यक्तीला, मग तो नेता कोणीही असो, त्याला सोडले जाणार नाही.
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार?
शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यापासून बांगलादेशात हिंदूंसह अल्पसंख्याकांवर अत्याचार होत असल्याच्या बातम्या येत आहेत. हिंदू आणि त्यांच्या धार्मिक स्थळांना लक्ष्य केले जात आहे. चिन्मय कृष्ण दास हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात आवाज उठवण्याचे आणि त्यांना संघटित करण्याचे काम करत आहेत. दरम्यान, आता त्यांना अटक करण्यात आली आहे.
या अटकेवर आसिफ महमूद यांनी सांगितले की, कायदा सामुदायिक हिताच्या आधारावर नाही तर राष्ट्रीय सुरक्षेच्या आधारावर काम करतो.
चिन्मय कृष्ण दास यांना सोमवारी ढाका विमानतळावर अटक करण्यात आली. त्यांच्या अटकेनंतर बांगलादेशी हिंदूंमध्ये प्रचंड रोष होता आणि अनेक ठिकाणी निदर्शने झाली. दास यांच्या अटकेवर भारताने मंगळवारी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, 'हिंदू अल्पसंख्याकांना लक्ष्य करणाऱ्या गुन्हेगारांऐवजी शांततापूर्ण सभांद्वारे न्याय मागण्या मांडणाऱ्या हिंदू धर्मगुरूंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणे दुर्दैवी आहे.
चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेच्या विरोधात शांततेने आंदोलन करणाऱ्या हिंदू अल्पसंख्यांकांवर होणाऱ्या हल्ल्यांबद्दलही आम्ही चिंता व्यक्त करतो. हिंदू आणि सर्व अल्पसंख्याकांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी आम्ही बांगलादेशच्या अधिकाऱ्यांना विनंती करतो, असंही या निवेदनात म्हटले आहे.
बांगलादेशनेही निवदेन जारी केले
भारताच्या या वक्तव्यानंतर बांगलादेशनेही एक निवेदन जारी केले आहे. या त चिन्मय दास यांच्या अटकेचा काही वर्तुळात चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचे म्हटले आहे. भारताचे विधान निराधार आणि मैत्रीच्या भावनेच्या विरुद्ध असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'आम्ही अत्यंत निराशेने आणि तीव्र वेदनांनी सांगतो की चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेचा काही भागांमध्ये गैरसमज झाला आहे. चिन्मय कृष्ण दास यांना वेगवेगळ्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. अशी बिनबुडाची विधाने केवळ तथ्यांची चुकीची माहिती देत नाहीत तर दोन शेजारी देशांमधील मैत्री आणि परस्पर समंजसपणाच्या भावनेच्या विरुद्ध आहेत, असंही या निवेदनात म्हटले आहे.