इस्लामाबाद - पाकिस्तानची नागरिक असलेली सीमा हैदर आपल्या प्रियकरासाठी भारतात आली. मात्र ती भारतात आल्यापासूनच सिंधमधील हिंदूंना धमक्या मिळायला सुरुवात झाली आहे. कट्टरवाद्यांच्या भीतीने लोकांनी मंदिरात जाणे आणि घराबाहेर पडणेही जवळपास बंद केले आहे. यातच, पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्ला खान यांनी या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत, सिंधमधील हिंदू समुदायाचे संरक्षण वाढविण्याचे आदेश दिल्याचे वृत्त आहे.
पाकिस्तानी पत्रकार गुलाम अब्बास शाह यांनी ट्विटच्या माध्यमाने दावा केला आहे की, 'गृहमंत्री राणा सनाउल्ला खान यांनी सीमा हैदर प्रकरणानंतर, हिंदू समाजाला दिल्या जात असलेल्या धमक्यांची दखल घेतली असून, संबंधित अधिकाऱ्यांना सिंध सरकारच्या अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधण्याच्या सूचना दिल्या आहेत. सिंधच्या पीएमएल-एनच्या अल्पसंख्यक विंगचे अध्यक्ष खील दास कोहिस्तानी यांनी सनाउल्लाह यांची भेट घेतली आणि हिंदू समाजाची सुरक्षितता मजबूत करण्यासंदर्भात आग्रह केला.'
मंदिरांमधील पूजा बंद - माध्यमांतील वृत्तांनुसार, सिंधमधील हिंदू समाजात सीमा हैदर प्रकरणामुळे भीतीचे वातावरण आहे. स्थानिक समाजकंटकांकडून हिंदू मंदिरांवर हल्ला करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. सोशल मिडियात शेअर होत असलेल्या व्हिडिओमध्ये या समाजकंटकांनी राज्यातील विविध ठिकाणी हिंदू समाजाला धमक्या देत, सीमाला पाकिस्तानात परत आणण्याची जबाबदारी घेतली आहे.
'आमच्याच मुलींचे रोज अपहरण करून, त्यांचे धर्मातरण केले जाते...' -एक्सप्रेस ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, एका स्थानिक हिंदूने सांगितल्यानुसार, 'दोन मंदिरांमध्ये नियमित पूजा बंद आहे. योग्य सुरक्षा व्यवस्था नाही. सीमाच्या प्रकरणाशी आमचा काहीही संबंध नाही. आमच्याच मुलींचे रोज अपहरण करून, त्यांचे धर्मातरण केले जात आहे आणि त्यांना मुस्लीम बनवले जात आहे.'