इस्लामाबाद : कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर पाकिस्तानने आता पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) पोलिसांनी भारताची गुप्तहेर यंत्रणा रिसर्च अॅण्ड अॅनालिसिस विंगच्या (आरएडब्ल्यू) तीन संशयित एजंट्सना अटक केल्याचा दावा केला आहे.हे तिघे पाकिस्तानविरोधी कारवाया करीत होते, असे पाकिस्तानचे म्हणणे आहे. अब्बासपूरमधील पोलीस ठाण्याबाहेर गेल्या सप्टेंबरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात या तिघांचा समावेश होता, असा दावा तेथील पोलिसांनी केला आहे. मात्र ते तिघेही पाकव्याप्त काश्मीरचेच नागरिक असल्याचे सांगण्यात येते. चेहेरे झाकलेल्या या तीन संशयितांना रावळपिंडीमध्ये प्रसारमाध्यमांसमोर आणण्यात आले, असे वृत्त ‘डॉन’ने दिले. हे तिघे पाकव्याप्त काश्मीरमधील अब्बासपूर येथील तरोती खेड्याचे रहिवासी आहेत. पूंछचे उप पोलीस अधीक्षक साजीद इम्रान यांनी सांगितले की, या तिघांची नावे मोहम्मद खलील, इम्तियाझ आणि रशिद अशी आहेत. खलील याने नोव्हेंबर २०१४मध्ये रॉच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली होती, असा दावा केला. या कामासाठी खलील याला पाच लाख रुपये दिले गेले होते. या तिघांपैकी खलील हा गेल्या दोन वर्षांत अनेकदा पाकिस्तानात आला होता. त्याला हेरगिरीसाठी ५ लाख रुपये देण्यात आले होते आणि त्याच्या सांगण्यावरून इम्तियाझ आणि रशिद हेरगिरी करीत होते, असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
पाकमध्ये तिघांना अटक
By admin | Published: April 16, 2017 4:48 AM