इस्लामाबाद- पाकिस्तानमधील रिक्षाचालकाबरोबर एक बाका प्रसंग घडला आहे. मोहम्मद रशीदला स्वतःच्या मुलीला सायकल विकत घेऊन द्यायची होती. त्यासाठी त्यानं रिक्षा चालवत असतानाच मुलीसाठी म्हणून वर्षभरात 300 रुपये वेगळे जमवले होते. परंतु तो जेव्हा बँकेत गेला, तेव्हा त्याच्या खात्यात 3 अब्ज रुपये असल्याचं समजलं आणि तो बेशुद्धच पडला. एवढी मोठी रक्कम आपल्या खात्यात कुठून आली या प्रश्नानं तो चक्रावून गेला.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मनी लाँड्रिंगविरोधात कडक पावलं उचलण्याचं आश्वासन दिलं होतं, त्याचीही आठवण रशीद याला झाली. त्यानंतर फेडरल तपास यंत्रणेचा त्याला फोन आला, त्यावेळी तो हा सगळा प्रकार लपवू इच्छित होता. परंतु त्यांच्या कुटुंबीयांनी अधिका-यांना सहकार्य करण्याची त्याला सूचना केली. गेल्या काही दिवसांपूर्वीही असाच एक प्रकार पाकिस्तानात समोर आला होता. एका गरीब व्यक्तीच्या खात्यामध्ये अचानक पैसे आले होते आणि त्याला मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात देश सोडावा लागला.मोहम्मद रशीद म्हणाले, मी घाबरून रिक्षा चालवणं बंद केलं आहे. या प्रकारानंतर माझ्या पत्नीचंही स्वास्थ्य बिघडलं. खरं तर रशीदची निर्दोष म्हणून सुटका करण्यात आली आहे, तरीही त्याचं टेन्शन काही कमी झालेलं नाही. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा फार वाईट काळ सुरू आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी इम्रान खान यांनी मनी लाँड्रिंगअंतर्गत देशाबाहेर जाणारा पैसा परत आणण्याचा संकल्प केला आहे.