लंडन : ब्रिटनचे नवे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांच्या कॅबिनेटमध्ये भारतीय वंशाच्या तीन जणांची वर्णी लागली आहे. गृहमंत्रीपदी प्रीती पटेल, तर आंतरराष्ट्रीय विकास खात्याच्या मंत्रीपदी आलोक शर्मा आणि रिषी सुनक यांची वित्त खात्याच्या मंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी ३१ आॅक्टोबरच्या आत युरोपीय संघातून बाहेर पडण्याचा संकल्प केला आहे.प्रीती पटेल या ब्रेक्झिट धोरणाच्या समर्थक राहिलेल्या आहेत. गृहमंत्रीपदाची जबाबदारी सोपविली जाणे ही अतिशय सन्मानाची बाब असल्याचे प्रीती पटेल यांनी म्हटले आहे. त्या म्हणाल्या की, देशातील लोकांना सुरक्षित ठेवणे आणि वाढती गुन्हेगारी रोखणे, याला आपण प्राधान्य देणार आहोत.
कन्झर्व्हेटिव्ह पार्टीचे सदस्य आणि नारायण मूर्ती यांचे जावई असलेले रिषी सुनक (३९) यांच्याकडे वित्त खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. भारतीय वंशाचे आलोक वर्मा हे जॉन्सन यांचे समर्थक समजले जातात. त्यांच्याकडे आंतरराष्ट्रीय विकास विभाग देण्यात आला आहे.रिषी सुनक हे एमबीए असून, निष्पक्ष व्हिसाचे त्यांनी समर्थन केलेले आहे. ब्रिटिश वित्त मंत्रालयात त्यांनी महत्त्वाचा पदभार सांभाळलेला आहे.