न्यूयॉर्क : कोरोनाने हाहाकार माजविलेल्या अमेरिकेमध्ये सर्व व्यवहार पुन्हा सुरळीतपणे सुरू करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्रिस्तरीय कार्यक्रम गुरुवारी जाहीर केला. अमेरिकेतील काही राज्यांत कोरोनाच्या साथीचे अगदी नगण्य प्रमाण उरले आहे किंवा साथीचे निर्मूलन झाले आहे. अशा राज्यांना या कार्यक्रमाची लगेचच अंमलबजावणी करता येईल, असेही त्यांनी सांगितले. हा त्रिस्तरीय कार्यक्रम फारसा उपयुक्त नसल्याची टीका विरोधी बाकावरील डेमोक्रॅटिक पक्षाने केली आहे.
अमेरिकेची अर्थव्यवस्था व इतर व्यवहारांची गाडी पुन्हा रुळावर आणण्यासाठी प्रत्येक राज्यात त्रिस्तरीय कार्यक्रमाची अंमलबजावणी कधी करायची याचा निर्णय तेथील गव्हर्नरने परिस्थितीचा आढावा घेऊन करावयाचा आहे. अमेरिकेतील सर्व राज्यांच्या गव्हर्नरांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीनंतर ट्रम्प यांनी हा त्रिस्तरीय कार्यक्रम जाहीर केला.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, आपल्या राज्यात कोरोना व इन्फ्लुएन्झाच्या रुग्णांची संख्या खूप कमी झाली आहे याची खातरजमा प्रत्येक गव्हर्नरने करून मगच त्रिस्तरीय कार्यक्रमाची अंमलबजावणी करावी.
असे आहेत त्रिस्तरीय कार्यक्रमाचे टप्पेत्रिस्तरीय कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात विशिष्ट क्षेत्रातील कामगारांना टप्प्याटप्प्याने कामावर पुन्हा रुजू होण्यास सांगावे. त्यांना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे बंधन पाळावे लागेल. काही लोक कार्यालयात, तर काही लोक घरातूनच काम करतील. एखाद्या खोलीत किंवा जागेत दहापेक्षा जास्त लोक जमण्यास प्रतिबंध केला जाईल.कोरोना साथीचा प्रादुर्भाव आणखी न वाढल्यास दुसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी करावी. त्यामध्ये जमावबंदीचे नियम थोडे शिथिल करून एखाद्या ठिकाणी ५० लोकांना जमण्याची तसेच महत्त्वाच्या कारणांशिवाय अन्य बाबींसाठीही प्रवास करण्याची परवानगी देण्यात यावी, तसेच शाळा, जिम सुरू करण्यात याव्यात.तिसºया टप्प्यात सार्वजनिक कार्यक्रम तसेच उपक्रमांच्या आयोजनास संमती दिली जावी. कामाच्या ठिकाणी सध्या लागू असलेले निर्बंध दूर करावेत. परस्परांपासून विशिष्ट अंतर दूर राहून खेळता येईल, अशा खेळांना व उपक्रमांना परवानगी द्यावी. अशा रीतीने त्रिस्तरीय कार्यक्रमामुळे देशातील अर्थव्यवस्था हळूहळू पूर्वपदावर येईल. मात्र, या निकषांचे काटेकोर पालन न झाल्यास पूर्वीपेक्षा अधिक विपरीत परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे.अमेरिकेची भारताला ५९ लाख डॉलरची मदतच्वॉशिंग्टन : कोरोनाला रोखण्यासाठी अमेरिकेने भारताला ५९ लाख डॉलरची मदत केली आहे. विदेश विभागाने सांगितले की, कोरोनामुळे प्रभावित झालेल्या लोकांची देखभाल करणे आणि संसर्ग रोखण्यासाठी भारताला ही मदत केली जात आहे.च्अमेरिकेने ज्या देशांना कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी मदत केली आहे, त्यात अफगाणिस्तान (१.८ कोटी डॉलर), बांगलादेश (९६ लाख डॉलर), भूतान (५ लाख डॉलर), नेपाळ (१८ लाख डॉलर), पाकिस्तान (९४ लाख डॉलर) आणि श्रीलंका (१३ लाख डॉलर) यांचा समावेश आहे.