ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 24 - मॅन्चेस्टरमधील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी बुधवारी तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. मॅन्चेस्टरमध्ये सोमवारी रात्री अमेरिकी पॉप स्टार एरियाना ग्रांदे हिच्या संगीताच्या कार्यक्रमातून हजारो लोक बाहेर पडत असताना इसिस या दहशतवादी संघटनेने आत्मघाती हल्ला केला होता. या हल्ल्यात 22 जणांचा मृत्यू झाला असून 59 जण जखमी झाले आहेत.
बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, या स्फोटात ठार झालेल्या आत्मघाती हल्लेखोराचे नाव सलमान अबेदी असे होते व तो २२ वर्षांचा होता. सलमान अबेदी याचा भाऊ इस्माईल याला काल पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी आज संपूर्ण मॅन्चेस्टरमध्ये जोरदार धाड व झडतीसत्र सुरु केली असून तिघा संशयित आरोपींना अटक केली आहे.
दरम्यान, ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी या घटनेचा निषेध केला आहे. सर्वच देशांच्या प्रमुखांनी या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनीही घटनेची निंदा केली आहे. ब्रिटनमधील सार्वत्रिक निवडणुकांच्या काही आठवडे अगोदरच हा हल्ला झाल्याने थेरेसा मे आणि लेबर पार्टीचे जेरेमी कोर्बिन यांनी प्रचार मोहीम स्थगित केली आहे.
लंडनमध्ये 7 जुलै 2005 मध्ये अतिरेकी हल्ला झाला होता. यावेळी साखळी स्फोट घडवून आणण्यात आले होते. यात 52 ठार, तर 700 हून अधिक नागरिक जखमी झाले होते.
गुरुद्वाराचा मदतीचा हात...
- मॅन्चेस्टर येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर पीडित आणि गरजूंच्या मदतीसाठी गुरुद्वाराने पुढाकार घेतला आहे. स्फोटात जखमी झालेल्यांना तसेच मदतीसाठी धावाधाव करत असलेल्यांना गुरुद्वाराने आसरा दिला आहे. हरजिंदर सिंग यांनी ट्विट करत परिसरातील चार गुरुद्वारांचा पत्ता दिला आहे.