इस्लामाबाद : भारतीय लष्कराने नियंत्रण रेषेवर केलेल्या गोळीबारात आपल्या एका सैनिकासह ३ जण ठार झाले आहेत, असा आरोप पाकिस्तानने केला आहे. या हल्ल्यात अन्य चार नागरिक जखमी झाल्याचेही पाकिस्तानी लष्कराने म्हटले आहे.पाकिस्तानने म्हटले की, भारतीय लष्कराने रावळकोट भागात नागरी वस्त्यांवर बेछूट गोळीबार केला. त्यात एका महिलेसह दोन नागरिक ठार झाले, तसेच एक जण जखमी झाला. या परिसरात गस्त घालणारे एक पाकिस्तानी लष्करी पथकही या हल्ल्यात सापडले. त्यात नायब सुभेदार नदीम हा सैनिक ठार झाला. अन्य तीन सैनिक जखमी झाले.गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी लष्कर भारतीय सीमा चौक्यांवर तसेच काश्मीर व जम्मूमधील नागरी वस्त्यांवर गोळीबार करीत आहे. त्यात भारतीय जवान व भारतीय नागरिक मरण पावले आहेत. त्यानंतर भारताने जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा पाकिस्तानला दिला होता. मात्र पाकिस्तानच्या आरोपानंतर भारतीय लष्कराने आपण तिथे गोळीबार केला का, याची माहिती दिलेली नाही. (वृत्तसंस्था)नवाज शरीफ यांच्याकडेच पुन्हा पक्षाचे नेतृत्व?इस्लामाबाद : न्यायालयाने अपात्र म्हणून घोषित करण्यात आलेला लोकप्रतिनिधी राजकीय पक्षाचे नेतृत्व सांभाळू शकतो, अशा आशयाचे विधेयक पाकिस्तानात प्रस्तावित असून त्याला मंजुरी मिळाल्यास नव्या कायद्यानुसार, माजी पंतप्रधान नवाज शरीफ पीएमएल-एनचे नेतृत्व पुन्हा करू शकतील, असे सांगण्यात येत आहे. पनामा पेपर घोटाळा प्रकरणात देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने २८ जुलै रोजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना अपात्र ठरविले होते. त्यानंतर त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.विरोधी पक्षांचे आव्हान?मंत्री एम. खान म्हणाले की, विधेयक कनिष्ठ सभागृहात सहज मंजूर होईल. तिथे पीएमएल-एनचे बहुमत आहे. संमतीनंतर नवाज शरीफ पुन्हा पक्षाची धुरा सांभाळू शकतात. मात्र पाकिस्तानातील विरोधी पक्ष या विधेयकाला ला न्यायालयात आव्हान देण्याची शक्यता आहे.
भारताच्या गोळीबारात पाकिस्तानचे तिघे ठार, पाक लष्कराचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2017 2:31 AM