काठमांडू : नेपाळमधील मोठ्या भूकंपानंतर सावरणाऱ्या नागरिकांना पुन्हा पुन्हा बसणारे धक्के निराशेच्या गर्तेत ढकलत आहेत; पण रविवारचा दिवस मात्र या निराशेवर मात करणारा ठरला. भीषण भूकंप होऊन आठ दिवस उलटल्यानंतर तिघांची ढिगाऱ्याखालून सुखरूप सुटका झाली व जमावासाठी तो आशेचा किरण ठरला. पुन्हा पुन्हा बसणारे धक्के नागरिकांचे मनोबल खच्ची करीत आहेत. रविवारची सकाळही अशीच होती, दिवसाची सुरुवात ४.३ मॅग्निट्यूडच्या भूकंपाने झाली. घबराटीची नवी लहर फिरली. पाऊस व थंडीचे हवामान, त्यातच खुल्या जागेत तंबू उभारून उपाशीपोटी राहणारे नागरिक कमालीचे भयभीत आहेत. २५ एप्रिलच्या भूकंपाने मरणारांची संख्या आता ७ हजारांची सीमा ओलांडून गेली असून, मृतांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल, अशी भीती व्यक्त होत आहे. जखमींची संख्या १४,२२७ आहे. अर्थमंत्री रामशरण महात यांनी मृतांची संख्या बरीच वाढेल, अशी भीती व्यक्त केली. ते बाकू येथे अशियान विकास बँकेच्या बैठकीत बोलत होते.मदत पथकाने तीन जणांची ढिगाऱ्याखालून सुखरूप सुटका केली. यात दोन पुरुष आणि एक महिला आहे. यातील फंचू गले हे १०५ वर्षांचे आहेत. डोंगराळ भागातील सायुली खेड्यातून या तिघांची सुटका केली. मोठी विमाने उतरण्यास बंदीभूकंपग्रस्त नेपाळने लाखो लोकांसाठी मदत घेऊन येणाऱ्या मोठ्या विमानांना काठमांडू येथील विमानतळावर उतरण्यास बंदी घातली आहे. त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पाच दशके जुन्या धावपट्टीला तीनहून अधिक तडे गेल्याने नेपाळी अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. अर्थात १९६ टनाहून अधिक वजन असलेल्या विमानांना त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरण्यास परवानगी असणार नाही. गेल्या २५ एप्रिल रोजी आलेल्या भूकंपानंतर १५० चार्टर्डसह ३०० हून अधिक विमानांद्वारे मदत साहित्य येथील विमानतळावर आले. बुधवारी विमानतळावर ४४७ उड्डाणे झाली. (वृत्तसंस्था)
आठ दिवसांनी तीन जणांची सुखरूप सुटका
By admin | Published: May 04, 2015 12:32 AM