स्टॉकहोम : भौतिकशास्रासाठी नोबेल पुरस्कार जपान, जर्मनी आणि इटलीच्या शास्रज्ञांना मंगळवारी जाहीर झाला आहे. “पृथ्वीच्या हवामानाचे भौतिक मॉडेलिंग, परिवर्तनशीलतेचे परिमाण ठरवणे आणि जागतिक तापमानवाढीचे विश्वासार्ह अनुमान करण्याच्या कामासाठी” स्युकुरो मनाबे (९०) व क्लाऊस हॅस्सेलमान (८९) यांची पुरस्कारासाठी निवड झाली तर पुरस्काराच्या दुसऱ्या भागासाठी जिओर्जिओ पॅरिसी (७३) यांची “परमाणूपासून ग्रहांच्या मापदंडांपर्यंत भौतिक प्रणालीत दोष आणि चढ-उतारांचा परस्परांवर होणाऱ्या परिणामांच्या शोधाबद्दल” निवड झाली, असे निवड समितीने म्हटले.
१९६० पासून मनाबे हे वातावरणात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कसे वाढत आहे आणि त्यामुळे जागतिक तापमान कसे वाढेल हे सांगत होते. क्लाऊस हॅस्सेलमान यांनी साधारण दशकभरानंतर मॉडेल तयार केले. या मॉडेलची मदत हवामानाचे स्वरूप गोंधळाचे असूनही हवामान मॉडेल्स विश्वासार्ह का आहेत यासाठी होते. पॅरिसी यांनी गहन भौतिक आणि गणितीय मॉडेल तयार केले. त्यामुळे गुंतागुंतीच्या प्रणाली समजून घेण्यास मदत होते. पुरस्कारांची घोषणा रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसचे सरचिटणीस गोरॅन हानस्सन यांनी केली. पुरस्कार म्हणून १० दशलक्ष क्रोनोर (१.१४ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) आणि सुवर्णपदक दिले जाईल.