जकार्ता : आई-वडील, दोन मुलं आणि दोन मुली अशा अख्ख्या कुटुंबाने मिळून इंडोनेशियाला दहशतवादी हल्ल्यांनी हादरवून सोडले. या कुटुंबाने मिळून तीन चर्चवर केलेल्या हल्यात १३ जण ठार झाले असनू, ४१ जण जखमी झाले आहेत. इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबादरी स्वीकारली आहे. या देशातील अल्पसंख्याक ख्रिश्चन समुदायावर झालेल्या आजवरच्या भीषण हल्ल्यांपैैकी हा एक हल्ला आहे.सांता मारिया रोमन कॅथलिक चर्चवर हल्लेखोरांनी पहिला आत्मघाती बॉम्बहल्ला चढविला. त्यात एक किंवा त्याहून अधिक हल्लेखोरांसहित चार जण ठार झाले. या बॉम्बहल्ल्यांमध्ये ४१ जण जखमी झाले असून त्यात दोन पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पहिल्या हल्ल्यानंतर काही मिनिटांतच दुसरा आत्मघाती बॉम्बहल्ला या शहरातील दिपोनेगोरो भागातील चर्चवर व तिसरा हल्ला पॅन्टोकोस्टा चर्चवर करण्यात आला. हल्लेखोरांमधील महिलेने दिपोनेगोरो येथील चर्चमध्ये आपल्या सोबत दोन लहान मुले व एक बॅगही आणली होती.अॅण्टोनिअस नावाच्या एका गार्डने या महिलेला थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र, त्याचे म्हणणे न ऐकताच ती पुढे चालत गेली. आत गेल्यावर एका नागरिकाला तिने मिठी मारली आणि त्याचवेळी स्फोट झाला.इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको जोकोवी विदोदो यांनी सूराबाया शहराला भेट देऊन हल्ला झालेल्या घटनास्थळांची पाहाणी केली. ते म्हणाले की, दहशतवादाविरोधात सर्वांत एकजूट व्हावे लागेल. अशा भ्याड हल्ल्यांना सरकार सहन करणार नाही. इंडोनेशिया चर्च असोसिएशनने या हल्ल्याचा निषेध केला.जकार्ता येथे संशयित दहशतवाद्यांना डांबून ठेवलेल्या कारागृहामध्ये उसळलेल्या दंगलीत सहा पोलिस अधिकारी व तीन कैद्यांचा मृत्यू झाला होता. ही दंगल पोलिसांनी गुरुवारी आटोक्यात आणली होती. त्यानंतर आता चर्चवर हल्ले झाले.बॉम्बस्फोटांत नऊ ठारजलालाबाद : अफगाणिस्तानातील जलालाबाद शहरात दहशतवाद्यांनी वित्त खात्याच्या इमारतीजवळ रविवारी दोन बॉम्बस्फोट घडविले व तसेच या इमारतीत घुसले. या बॉम्बस्फोटात नऊ ठार व ३० जखमी झाले. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणीही घेतलेली नाही.पॅरिसमध्ये चाकूने हल्ला; एक ठारपॅरिस : येथे एका व्यक्तीने चाकूने अनेकांवर हल्ला केला. त्यात एक मरण पावला असून चार जखमी झाले आहेत. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात हा हल्लेखोर ठार झाला आहे. हा दहशतवादी हल्ला असल्याचा पोलिसांचा कयास आहे.‘जमात अंशारूत दौला’चे सदस्यइस्लामिक स्टेटने आपली प्रचार संस्था ‘अमाक’च्या माध्यमातून सांगितले की, तीन चर्चवर हल्ला करणारे सर्व सहा जण एकाचे कुटुंबातील होते. त्यात आई-वडील, दोन मुली (नऊ वर्ष आणि १२ वर्ष) तसेच दोन मुलं (१६ वर्ष आणि १८ वर्ष) यांचा समावेश आहे. हे सर्व जण स्थानिक दहशतवादी संघटना ‘जमात अंशारूत दौला’चे सदस्य होते. ही संघटना इस्लामिक स्टेटचे समर्थन करणारी दहशवादी संघटना आहे.२००० साली नाताळदरम्यान इंडोनेशियातील काही चर्चवर करण्यात आलेल्या बॉम्बहल्ल्यात १५ जण ठार व १०० जखमी झाले होते. रविवारी चर्चवर पाच हल्लेखोरांनी आत्मघाती बॉम्बहल्ले केले असावे असा पोलिसांचा कयास आहे.
सहा जणांच्या कुटुंबाने केले तीन अतिरेकी हल्ले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 2:08 AM