बीजिंग - एकीकडे भारतात राष्ट्रगीताला उभं राहायचं की नाही यावरुन वाद-विवाद सुरु असताना चीनने मात्र राष्ट्रगीताचा अपमान करणा-यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. चीनच्या संसदेत राष्ट्रगीताचा अपमान करणा-यांवर कठोर कारवाई करण्यासंबंधी कायदा संमत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. यानुसार राष्ट्रगीताचा अपमान करणा-यांना तीन वर्षाच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते असं वृत्त स्थानिक वृत्तवाहिनी शिन्हुआने दिलं आहे.
सप्टेंबर महिन्यात चीनने आपलं राष्ट्रगीत 'मार्च ऑफ द वॉलिंटिअर्स'चा अपमान करणा-यांना 15 दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्यासंबंधीचा कायदा संमत केला होता. हा कायदा चीनव्याप्त हाँगकाँग आणि मकाऊलाही लागू होता. संसदेने यानंतर राष्ट्रगीताचा अपमान करणा-यांसाठी गुन्हेगारी कायद्यात काही बदल करुन फौजदारी खटला दाखल करु शकतो का यावर विचार केला.
सोमवारी सुरु झालेल्या संसदेच्या स्थायी समितीच्या द्वि-मासिक सत्रात कायद्याचा मसुदा मांडण्यात आला. उल्लंघन करणा-यांना तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा करण्यासंबंधी मसुद्यात उल्लेख आहे. पण या कायद्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही.
शिन्हुआने दिलेल्या वृत्तानुसार, राष्ट्रगीताचा वापर फक्त नॅशनल पिपल्स काँग्रेसच्या कार्यक्रमांच्या सुरुवातील आणि शेवटी केला जाऊ शकतो. याशिवाय अधिकृत राजकीय सभा तसंच राजकीय कार्यक्रमांसहित मोठ्या कार्यक्रमांमध्ये राष्ट्रगीत वापरलं जाण्याची परवानगी असणार आहे. महत्वाचं म्हणजे खासगी कार्यक्रमांमध्ये, जाहिराती आणि सार्वजनिक ठिकाणी राष्ट्रगीताचा वापर करणं कायद्याने गुन्हा ठरणार आहे. कायदा समंत झाल्यास नियमाचं उल्लंघन करणा-यांना तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते.
चीनने राष्ट्रगीताचा वापर करण्यावरुन 2014 मध्येही नियम केले होते. नियमाअंतर्गत लग्न, अंत्यसंस्कार आणि मनोरंजन तसंच खासगी कार्यक्रमांमध्ये राष्ट्रगीताचा वापर केला जाऊ शकत नाही.