बीजिंग : तिबेटमधील सर्वात पवित्र शहरांपैकी एक शिगाझे शहराजवळ मंगळवारी ६.८ तीव्रतेचा भूकंप झाला. यात १२६ लोक ठार, तर १८८ जण जखमी झाले आहेत. नेपाळ तसेच भारतात बिहार, उत्तरप्रदेशमधील काही जिल्ह्यांमध्ये आणि दिल्लीतही भूकंपाचे धक्के जाणवले.
प्रादेशिक आपत्ती निवारण मुख्यालयानुसार, मंगळवारी सकाळी ९.०५ वाजता (चिनी वेळेनुसार) तिबेट स्वायत्त प्रदेशातील शिगाझे शहरातील डिंगरी काउंटीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. अमेरिकी भूगर्भीय सर्वेक्षणाने भूकंपाची तीव्रता ७.१ रिक्टर स्केल इतकी नोंदवली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू ईशान्य नेपाळच्या खुंबू हिमालय पर्वतरांगातील लोबुत्सेपासून ९० किलोमीटर होता. चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी भूकंपग्रस्तभागात मदत आणि बचावकार्य करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आदेश दिले आहेत.
माउंट एव्हरेस्ट पर्यटकांसाठी बंद
भूकंपानंतर चीनने मंगळवारी माउंट एव्हरेस्टचा भाग पर्यटकांसाठी बंद केला. डिंगरी हे माऊंट एव्हरेस्टचा बेस कॅम्प आहे. या निसर्गरम्य परिसरातील हॉटेल इमारती आणि आजूबाजूचा परिसराची कोणतीही हानी झालेली नाही. मात्र, तेथील विद्युतपुरवठा खंडित झाला आहे.
बिहारमध्ये हादरे
- बिहारमधील अनेक जिल्ह्यांना तसेच उत्तर प्रदेश आणि दिल्लीलाही भारतीय वेळेनुसार सकाळी ६.३५ मिनिटांनी भूकंपाचे जोरदार हादरे बसले. बिहारमध्ये जाणवलेल्या भूकंपाची तीव्रता ५.३ इतकी होती. कडाक्याच्या थंडीतही लोक घरातून बाहेर पडले.
- यात पाटणा, मधुबनी, शेओहर, मुंगेर, समस्तीपूर, मुझफ्फरपूर, कटिहार, दरभंगा, पश्चिम चंपारण, पूर्व चंपारण, कटिहार, पूर्णिया, शिवहर, दरभंगा आणि समस्तीपूर या जिल्ह्यांचा समावेश असल्याचे बिहारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले.