अमेरिकेतील एका क्रेडिट कार्ड प्रोसेसिंग कंपनीने 6 वर्षांपूर्वी प्रत्येक कर्मचाऱ्याचे किमान वार्षिक वेतन सुमारे 51 लाख रुपये केले होते. ग्रॅव्हिटी पेमेंट्स (Gravity Payments ) नावाच्या कंपनीच्या या निर्णयानंतर अनेकांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर आल्या होत्या. पण आता कंपनीचे सीईओ डॅन प्रिस म्हणतात की, कर्मचाऱ्यांचे पगार वाढवण्याचे धोरण यशस्वी झाले आहे. (gravity payments raised salary 70000 us dollar all employees ceo explains success)
विशेष गोष्ट म्हणजे सर्व कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 51 लाख करण्यासाठी सीईओ डॅन प्रिस यांना त्यांचे वार्षिक वेतन 7 कोटींनी कमी करावे लागले होते. या निर्णयानंतर अनेकांनी डॅन प्रिस यांनी 'हिरो' असल्याची उपाधी दिली होती. तर काही लोकांनी कंपनी दिवाळखोरीत जाईल असा अंदाज व्यक्त केला होता.
यानंतर आता डॅन प्रिस यांनी सांगितले की, ग्रॅव्हिटी पेमेंट खूप प्रगती करत आहे आणि कंपनी सोडून जाणारा कर्मचाऱ्यांची निम्मी संख्या कमी झाली आहे. तसेच, कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 6 वर्षांपूर्वीच्या तुलनेत दुप्पट झाली आहे, असे डॅन प्रिस यांनी म्हटले आहे. दरम्यान, सीईओ डॅन प्रिस यांनी स्वतःचा पगार सध्याही फक्त 51 लाख रुपये वार्षिक ठेवला आहे.
यासंदर्भात डॅन प्रिस यांनी CBS Newsशी संवाद साधला. यावेळी डॅन प्रिस म्हणाले की, पगार वाढवल्यानंतर कर्मचारी कंपनीशी अधिक निष्ठावान झाले. 2020 मध्ये कोरोना संकट काळात कंपनीची स्थिती बिकट झाली होती, परंतु काही महिन्यांमध्ये आलेल्या अडचणीनंतर कंपनी पुन्हा प्रगती करण्यात यशस्वी झाली. यादरम्यान, काही कर्मचाऱ्यांनी त्यांच्या इच्छेनुसार काही महिन्यांचा पगार कमी केला होता.
दरम्यान, पगार वाढवल्यानंतर ग्रॅव्हिटी पेमेंट्सच्या कर्मचाऱ्यांनी मिळून त्यांच्या सीईओला एक आलिशान कार भेट दिली होती. मात्र सीईओ त्याच्या जुन्या पगारात कार खरेदी करू शकत होते? असा प्रश्न विचारला असता सीईओ डॅन प्रिस म्हणाले की, हे खरे आहे, पण मी पूर्वीपेक्षा आता खूप आनंदी आहे.