न्यूयॉर्क- भूतकाळात झालेल्या लैंगिक शोषणाबद्दल मौन सोडणाऱ्या महिलांना प्रतिष्ठित 'टाइम' मॅगझिनने 'पर्सन ऑफ द इअर' हा पुरस्कार देऊन गौरविलं आहे. टाइम मॅगझिनने या महिलांचा 'सायलेंस ब्रेकर्स' असा उल्लेख केला आहे. अमेरिकेतील समाजात असणारा स्त्रीयांच्या लैंगिक शोषणाचा मुद्दा या महिलांच्या पुढाकाराने समोर आला. लैंगिक शोषणाविरूद्धच्या मोहीमेची सुरूवात #MeToo ने करण्यात आली. हॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींनी या अभिनायाअंतर्गत प्रसिद्ध हॉलिवूड निर्माते-दिग्दर्शक हार्वे वाइनश्टीन यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या कॅम्पनेला पाठिंबा देत अनेक सर्वसामान्य महिलांनी त्यांच्यावर भूतकाळात घडलेल्या घटनांचा उलगडा केला. जगभरातील अनेक महिलांनी त्यांच्याबरोबर झालेला गैरव्यवहार व कडवट अनुभव जगासमोर सांगितला.
#metoo नावाने सुरू झालेल्या कॅम्पेनमुळे हॉलिवूडबरोबर व्यवसायिक, राजकारण, मीडियामध्ये काम करणाऱ्या महिलांनी त्यांच्याबरोबर घडलेल्या घटनांबद्दल सांगितलं. टाइम मॅगझिनने कव्हर पेजवर प्रत्येक क्षेत्रातील एका महिलेला दाखवून प्रत्येक ठिकाणी असणारी लैंगिक शोषणाची झलक दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.
मॅगझिनच्या कव्हर पेजवर पाच महिलांचा फोटो आहे. टाइम मॅगझिनच्या या कव्हर पेजवर हॉलिवूड अभिनेत्री अॅश्ले जेड आहे. या अभिनेत्रीने हॉलिवूड निर्माते हार्वे वाइनश्टीनवर पहिल्यांदा लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. त्यानंतर अनेक अभिनेत्रींनी त्याच निर्मात्यावर आरोप केले. या कव्हर पेजवर पॉप सिंगर टेलर स्विफ्टचाही सहभाग आहे. टेलर स्विफ्टने आधी तिच्याबरोबर काम करणाऱ्या एका डीजेवर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता यामध्ये उबरच्या माजी सीईओ सुसैन फोवलेर हीचा समावेश आहे. सुसैनच्या आरोपानंतर उबरच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला पदावरून हटविण्यात आलं होतं. याबरोबर लॉबीस्ट आदामा इवू आणि इसाबेल पास्क्युअल या दोघीही कव्हर पेजवर दिसत आहेत.
टाइम मॅगझिनने बुधवारी 'टूडे शो' या कार्यक्रमात पर्सन ऑफ द इअर-2017ची घोषणा केली. लैंगिक शोषणाच्या विरोधात आवाज उठविणाऱ्या महिलांना पर्सन ऑफ द ईयरचा मान देणं, हा #metoo कॅम्पेनचा भाग असल्याचं टाइम मॅगझिनचे मुख्य संपादक एडवर्ड फेलसेनथाल यांनी म्हंटलं. काही महिला व पुरूषांचं समाजाच्या समोर येऊन लैंगिक शोषणावर बोलणं, हा समाजामध्ये झपाट्याने होणारा बदल असल्याचं त्यांनी म्हंटलं.