Titan Submarine: टायटॅनिकची सफर घडवणारी पाणबुडी बेपत्ता होऊन चार दिवस उलटले तरी त्याबद्दल काहीही माहिती मिळाली नव्हती. हळुहळू खोल समुद्रात पाणबुडीत अडकलेल्या लोकांच्या जीवाच्या आशाही पल्लवित होऊ लागल्या होत्या. पण अखेर ती पाणबुडी सापडल्यानंतर, त्यातील पाचही जणांचा मृत्यू झाल्याचे समजले. सुमारे ९६ तास पुरेल इतका ऑक्सिजन पाणबुडीत शिल्लक होता. पण शोधमोहिम सुरू असताना, 8 तासांपेक्षा कमी ऑक्सिजन आत शिल्लक असल्याचा अंदाज बांधला जात होता. 18 जून रोजी या पाणबुडीने अटलांटिक महासागराची खोली मोजण्यास सुरुवात केली. त्याला 4 हजार मीटरचा प्रवास करायचा होता पण दीड तासानंतर त्याचा संपर्क तुटला. त्यात पायलट, ब्रिटीश साहसी आणि पाकिस्तानी पिता-पुत्र अशा पाच जणांचा समावेश होता. याशिवाय टायटॅनिकचा एक तज्ज्ञही जहाजावर होता. ही पाणबुडी वॉशिंग्टनमधील ओशनगेट कंपनीची होती. त्यांचा मृत्यू झाल्याचे अखेर समोर आले. त्यामुळे त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण काय यावर आता चर्चा सुरू झाली आहे.
मृत्यूचे कारण काय?
निवृत्त रॉयल नेव्ही ऑफिसर रे सिंक्लेअर यांनी दावा केला आहे की विषारी कार्बन डायऑक्साईडमुळे जहाजावरील सर्वांचा आधीच मृत्यू झाला असावा, असा दावा डेली एक्सप्रेस अमेरिकाने केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की पाणबुडीमध्ये अशा बॅटरी असतात ज्या ठराविक कालावधीसाठी चार्ज राहतात. त्यात CO2 स्क्रबर्स असतात जे कार्बन डायऑक्साइड शोषत राहतात. त्यांनी काम करणे बंद केले तर या विषारी वायूमुळे लोकांचा मृत्यू होऊ शकतो.
कॅनडाची जहाजे आणि पाणबुडे सोमवारपासून या भागात शोध घेत होते. सोनारच्या माध्यमातून त्यांचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू होते. कॅनडाच्या विमानांनीही मंगळवार आणि बुधवारी शोध मोहीम राबवली. त्यांना पाण्याच्या आतून किंचाळण्यासारखा आवाज ऐकू आल्याचे त्यांनी म्हटले. त्यामुळे पाणबुडीतील लोक जिवंत असल्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. पण कालपर्यंत काहीही हाती लागले नव्हेत. अखेर काल रात्री उशिरा ही पाणबुडी सापडली आणि त्यातील पाचही जण मृत असल्याचे स्पष्ट झाले.
यूएस कोस्ट गार्डच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की समुद्राच्या आत आवाज कशामुळे झाला हे माहित नाही. या पाणबुडीचा शोध घेण्यासाठी जगातील सर्वात सक्षम उपकरणे वापरली जात असल्याचे कॅनेडियन कंपनी हॉरिझॉन मेरीटाईमने म्हटले होते. या शोधात गुंतलेले लोक जीव धोक्यात घालूनही पाणबुडी शोधण्याचा प्रयत्न करत होते. या पाणबुडीची लांबी 22 फूट आणि वजन 23 हजार पौंड होते. हे हलक्या वजनाच्या कार्बन फायबरपासून बनवले होते. याच्या आत प्रवासी कार्बन फायबर ट्यूबमध्ये बसायचे.