टायटॅनिकचा सांगाडा पाहण्यासाठी गेलेली टायटन पाणबुडी खोल समुद्रात बुडाली आहे. या दुर्घटनेच पाच अब्जाधीशांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ओशनगेट कंपनीचे मालक स्टॉकटन रश यांचा देखील समावेश आहे. आता या घटनेसंदर्भात नवी माहिती समोर येत आहे. लास व्हेगासला राहणारे एक गुंतवणूकदार जय ब्लूम यांनी मोठा खुलासा केला आहे. त्यांच्या एका निर्णयामुळे ते आणि त्यांचा मुलगा वाचला आहे.
स्टॉकटन रश यांनी स्वत: वर्षभरापूर्वी जय ब्लूम आणि त्यांचा मुलगा सीन ब्लूम यांना या पाणबुडीतून प्रवास करण्याची ऑफर दिली होती. यासाठी त्यांनी सवलतीच्या दरात तिकिटे देण्याचेही कबुल केले होते. खोल समुद्रात उतरून रोमांचकारी प्रवासाचा अनुभव घ्यावा तसेच टायटॅनिकचे अवशेष पहावेत असा आग्रह त्यांनी धरला होता. जेव्हा अपघात झाला तेव्हा ब्लूम यांनी त्याचा खुलासा केला आहे.
माझा मुलगा टायटॅनिकबाबत लहानपणापासून उत्सूक होता. आता तो २० वर्षांचा आहे. मला रश यांनी विचारताच मी त्या पाणबुडीबाबत माहिती घेण्यास सुरुवात केली. परंतू, ती वाचून मला आमच्या सुरक्षेची चिंता वाटली म्हणून मी ती ऑफर नाकारली. ती दोन तिकीटे पाकिस्तानी अब्जाधीश आणि त्याच्या मुलाला देण्यात आली. आता मी जेव्हा त्यांचे फोटो पाहतोय तेव्हा मला वाटतेय की त्यांच्या जागी माझा आणि माझ्या मुलाचा फोटो असता, असे ब्लूम यांनी म्हटले आहे.
महत्वाचे म्हणजे रशने या पाणबुडीतून प्रवासात कोणताही धोका नाही, असे मेसेज ब्लूम यांना केले होते. हेलिक़ॉप्टरमधून जाण्यापेक्षा किंवा स्कुबा डायव्हिंग करण्यापेक्षा या पाणबुडीतून जाणे जास्त सुरक्षित असल्याचे रशने ब्लूम यांना म्हटले होते. तसेच गेल्या ३५ वर्षांत सैन्याच्या पाणबुडीशिवाय अन्य कोणत्याही पाणबुडींमध्ये अपघात घडलेले नाहीत, असेही रश यांनी म्हटले होते. टायटनच्या डिझाईनबद्दल 2018 मध्येच उद्योग तज्ञ आणि रशच्या फर्मच्या माजी कर्मचाऱ्याने प्रश्न उपस्थित केले होते.