सिडनी : रॉयल मरीन सर्व्हिसेसच्या टायटॅनिक या ऐतिहासिक जहाजाची प्रतिकृती ‘टायटॅनिक-२’ या नावाने २०१८ मध्ये सेवेत रुजू होईल. १०६ वर्षांपूर्वी मूळ टायटॅनिक जहाज उत्तर अटलांटिक महासागरात बुडून १५०० पेक्षा जास्त लोक मरण पावले होते.आणखी दोन वर्षांनी जलावतरण करणारे टायटॅनिक जहाज २१ व्या शतकातील सुरक्षेच्या गरजा नजरेसमोर ठेवून बनविण्यात येत आहे. त्यानुसार मूळ जहाजापेक्षा नवे चार मीटर रुंद असेल. टायटॅनिक -२ या जहाजाची कल्पना आॅस्ट्रेलियातील अब्जाधीश क्लाईव्ह पामर आणि त्यांची कंपनी ब्लू स्टार यांची आहे. १९१२ मध्ये तयार झालेल्या टायटॅनिकसारखाच तोंडवळा या नव्या जहाजाचा असेल; परंतु नवी आवृत्ती चार मीटर रुंद असेल. बुडालेल्या टायटॅनिकमध्ये पुरेशा जीवरक्षक बोटी नव्हत्या. ती उणीव आता दूर केली जाईल. त्याच्या जोडीला संकटात समुद्रातून सुटका करण्याची व्यवस्थाही आहे. ‘टायटॅनिक -२’ २७० मीटर लांब, ५३ मीटर उंच आणि ४० हजार टन वजनाची असेल, असे बेलफास्ट टेलिग्राफने म्हटले. नव्या टायटॅनिकमध्येही जुन्या बोटीत होते तसे प्रथम, द्वितीय व तृतीय श्रेणीची तिकिटे असतील. नऊ मजल्यांच्या या बोटीला २४०० प्रवासी आणि ९०० कर्मचाऱ्यांना सामावून घेण्यासाठी ८४० केबीन असतील. (वृत्तसंस्था)चीनमधील जियांगसू येथून दुबईला करणार प्रयाणया जहाजावर पोहण्याचा तलाव, तुर्कीश बाथरूम्स आणि जिमखाना असेल. या जहाजाचे नियंत्रण उपग्रहाद्वारे होईल व त्याला डिजिटल नॅव्हिगेशन आणि रडार सिस्टीम असेल, असे ब्लू स्टार लाईनचे मार्केटिंग संचालक जेम्स मॅकडोनाल्ड यांनी सांगितले.मूळ जहाजाचा प्रवास साउदम्पटन ते न्यूयॉर्क असा होता. नवा प्रवास मात्र पूर्व चीनमधील जियांगसू येथून दुबई असा असेल. मूळ टायटॅनिक जहाज १९१२ मध्ये त्याच्या पहिल्याच प्रवासाला निघाल्यानंतर उत्तर अटलांटिक महासागरात हिमनगाला धडकून बुडाले व १५०० पेक्षा जास्त लोकांना जलसमाधी मिळाली होती.
२०१८ मध्ये ‘टायटॅनिक-२’ चे जलावतरण
By admin | Published: February 11, 2016 3:34 AM