नवी दिल्ली - दुर्घटनाग्रस्त टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी गेलेल्या टायटन पाणबुडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. यात पाकिस्तानातील उद्योगपती टाइकून शहजादा दाऊद आणि त्यांचा मुलगा सुलेमान दाऊदचा समावेश होता. १९ वर्षीय सुलेमान हा या पाणबुडीतील सर्वात कमी वयाचा प्रवासी होता. सुलेमान समुद्रातील खोल पाण्यात टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी जायला घाबरत होता. परंतु वडिलांमुळे तो भीती असतानाही या प्रवासाला गेला असं सुलेमानच्या काकीने सांगितले.
४६ वर्षीय शहजादा दाऊदची बहिण अजमेह दाऊद म्हणाल्या की, पाणबुडीचे कमांड शिप पोलर प्रिंस रवाना होण्याआधी मी भाच्याशी बोलले होते. सुलेमान खूप घाबरला होता. परंतु फादर्स डेनिमित्त वडिलांसोबतचे नाते आणखी घट्ट व मजबूत करण्यासाठी तो वडिलांसोबत समुद्रातील खोल पाण्यात जाण्यास तयार झाला. भाऊ शहजादाला लहानपणापासूनच टायटॅनिक जहाजात खूप रस होता. त्यांना ती पाहायची होती असं त्यांनी म्हटलं.
ऑशनगेट नावाची कंपनीचे ही पाणबुडी रविवारी समुद्रात बेपत्ता झाली होती. पाण्यात गेल्यानंतर २ तासांत त्यांचा जहाजाशी संपर्क तुटला. त्यानंतर अमेरिकेने या पाणबुडीचा शोध घेण्यासाठी मोठे सर्च ऑपरेशन राबवले. गुरुवारी पाणबुडीचे अवशेष सापडले आणि त्यातील पाचही प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. पाणबुडीचा मलबा टायटॅनिक जहाजाच्या पुढील भागापासून १६०० फूट अंतरावर सापडला. पाणबुडीत भयानक स्फोट झाल्याचे बचाव पथकाने सांगितले.
जर्नल ऑफ फिजिक्स कॉन्फ्रेंसनुसार, हा स्फोट खूप जलद झाला होता त्यामुळे यातील प्रवाशांचा मृत्यू झाला. या स्फोटामुळे जहाजातील प्रवाशांचा संपर्क तुटला. पाणबुडीत हा स्फोट का झाला याचा शोध घेतला जाणार आहे. दरम्यान, जर मला कुणी १० लाख डॉलर दिले असते तरी मी टायटनमधून समुद्रातील खोल पाण्यात गेली नसती शहजादा दाऊदच्या बहिणीने सांगितले.
कशी शोधली टायटन पाणबुडी?रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, शोध पथकाला टायटॅनिक जहाजाजवळ हरवलेल्या पाणबुडीचे अवशेष सापडले आहेत. यूएस कोस्ट गार्डच्या म्हणण्यानुसार पाणबुडीचे अवशेष सापडल्यानंतर तज्ज्ञांच्या पथकाने तपास सुरू केला आहे. कॅनडाच्या एका जहाजात बसलेल्या मानवरहित रोबोटने पाणबुडीचे अवशेष शोधून काढल्याचे सांगण्यात येत आहे.18 जून रोजी अमेरिकन कंपनी ओशनगेटची ही पाणबुडी टायटॅनिकचे अवशेष दाखवण्यासाठी प्रवासाला निघाली. टायटॅनिकचा टूर या भग्नावस्थेपर्यंत पोहोचणे, तिथे फिरणे आणि नंतर परत येणे हे सुमारे आठ तास चालते. टायटॅनिकच्या ढिगाऱ्याजवळ जायला दोन तास लागतात. चार तास पाणबुडी भग्नावस्थेचा परिसर दाखवते. त्यानंतर परतायलाही सुमारे दोन तास लागतात. शोध मोहिमेत खूप अडचणी आल्या.