ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 23 - टायटॅनिक जहाजावरील एका लॉकरची चावी नुकत्याच झालेल्या लिलावामध्ये तब्बल 85 हजार पौंडांना विकली गेली. टायटॅनिकला अपघात घडल्यावर या चावीचा वापर करत लाइफ जॅकेट असलेले लॉकर उघडण्यात आले होते.
लंडनमध्ये झालेल्या या लिलावात टायटॅनिकशी संबधित 200 वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. या लिलावात लॉकरच्या चावीवर 50 हजार पौंडपर्यंत बोली लागेल अशी अपेक्षा लिलावकर्त्यांना होती. मात्र तिला अपेक्षेहून अधिक किंमत मिळाली. या चावीला मिळालेली किंमत ही तिचे महत्त्व आणि उपयुक्तता सिद्ध करते, असे लिलावकर्ते अँड्र्यू अल्डिज म्हणाले.
ही चावी तृतीय श्रेणीचे कारभारी सिडने सेडर्नी यांच्या ताब्यात होती. 1912 साली जेव्हा टायटॅनिक हिमनगाला धडकून अपघातग्रस्त झाले तेव्हा या चावीच्या योग्य वेळी करण्यात आलेल्या वापराने अनेकांचे प्राण वाचवण्यास मदत झाली होती.