लंडन- हॉलिवूड अभिनेत्री मेगन मार्केल व ब्रिटनचे राजपुत्र प्रिन्स हॅरी आज विवाहबंधनात अडकणार आहेत. ब्रिटनमध्ये मोठ्या जल्लोषात हा शाही विवाहसोहळा पार पडेल. विंडसर कॅसलमधील सेंट चार्ज चॅपल चर्चमध्ये मेगन व प्रिन्स हॅरी यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. मेगन मार्कलचे वडील थॉमल मार्केल आजारी असल्याने लग्नाला हजर राहणार नाहीत. म्हणून प्रिन्स चार्ल्स मेगनला चर्चपर्यंत घेऊन जाणार आहेत. दरम्यान, प्राणी हक्कांसाठी लढणारी स्वयंसेवी संस्था ‘पेटा’ या नवजोडप्याला एक बैलाचे चित्र भेट देण्यात येणार आहे. मेरी असं या बैलाच नाव असून हे नाव मेगन आणि हॅरी या नावांवरून ठेवण्यात येणार आहे.
मेगन व प्रिन्स हॅरी यांच्या शाही विवाहामुळे संपूर्ण ब्रिटनमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं आहे. लग्नासाठी एक लाखांहून जास्त लोक विंडसर कॅसलमध्ये पोहोचले आहेत. या ठिकाणी सुरक्षेसाठी मोठा बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. पोलिस, गुप्तचर अधिकारी आणि लष्करी अधिकाऱ्यांवर शाही जोडीला संरक्षण पुरवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. मेगन मार्केल व प्रिन्स हॅरीच्या विवाहासाठी बॉलिवूडची अभिनेत्री व मेगन मार्केल यांची खास मैत्रिण प्रियंका चोप्रालाही निमंत्रण देण्यात आलं आहे.
दरम्यान, 36 वर्षीय मेगन मार्केलचं हे दुसरं लग्न आहे. २०११मध्ये तीने अमेरिकन निर्माता ट्रेवर एंजलसनसोबत लग्न केलं होतं. सात वर्ष ट्रेवर यांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न केलं. पण, २०१३ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. 33 वर्षीय प्रिन्स हॅरी आणि मेगनची भेट जुलै २०१६ मध्ये एका मित्राच्या घरी झाली होती. काही महिन्यांपूर्वीच हॅरीने तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता, तो मेगनने मान्य केला. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात मेगन व प्रिन्स हॅरी यांनी साखरपुडा केला.