आंतरराष्ट्रीय स्तरावर आजचा दिवस म्हणजे मे महिन्यातला पहिला शनिवार वर्ल्ड नेकेड गार्डनिंग डे किंवा जागितक नग्न बागकाम दिवस म्हणून साजरा केला जातो. निसर्गाच्या सानिध्यात नैसर्गिक अवस्थेत माणसानं रममाण व्हावं हा यामागचा मुख्य हेतू.
न्यूड अँड नॅचरल मॅगझिनचे संपादक सल्लागार मार्क स्टोरी व पर्माकल्चरलिस्ट जेकब ग्रब्रिएल यांनी हा दिवस साजरा करण्यास प्रथम सुरुवात केली. हा दिवस म्हणजे एक गंमत असावी, माणसांनी मोकळं व्हावं आणि सगळ्यात म्हणजे यात काहीही राजकीय असू नये अशी अपेक्षा हा दिवस साजरा करणाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
वर्ल्ड नेकेड बाइक राइडपासून प्रेरणा घेत स्टोरी व गॅब्रिएल यांना नग्न बागकाम दिवसाची कल्पना सुचली. आधी 10 सप्टेंबर 2005 रोजी प्रथम हा दिवस साजरा करण्यात आला, परंतु नंतर 2007 पासून मे महिन्याचा पहिला शनिवार निश्चित करण्यात आला, तेव्हापासून गेली 10 वर्षे आज हा दिवस जगभरात साजरा करण्यात येतो.
पोहणं वगळता, बागकाम हाच एक प्रकार असा आहे, ज्यामध्ये माणसं नैसर्गिकरीत्या कामाचा आनंद घेऊ शकतात असा काही जणांचा दावा आहे. निसर्ग हेच एक पुरेसं आवरण आहे ही देखील यामागची एक भावना असल्याचं सांगण्यात येतं.
काहीजणांनी तर याची संगती अॅडम व ईव्ह बागेमध्ये नग्नावस्थेत होते इथपर्यंत याची संगती लावली आहे. आज जागतिक नग्न बागकाम दिवस असला तरी भारतामध्ये असं काही करण्याचा प्रयत्न अंगलट येऊ शकतो हे वाचकांनी ध्यानात ठेवलेलं बरं...