लंडन : जगातील सर्वाधिक सुरक्षित शहरांमध्ये जपानमधील टोकियो शहराने प्रथम क्रमांक पटकाविला असून त्या यादीत दिल्ली ५३ व्या क्रमांकावर आहे. ‘इकॉनॉमिस्ट' या साप्ताहिकाच्या चमुने तयार केलेल्या या यादीत हाँगकाँगची २० व्या क्रमांकापर्यंत घसरण झाली आहे. तर वॉशिंग्टन शहराने आश्चर्यकारकरित्या १० व्या स्थानापर्यंत मजल मारली आहे.
या यादीसाठी जगातल्या पाच खंडातल्या साठ शहरांतील डिजिटल सोयी, आरोग्य व पायाभूत सुविधा, आत्पकालीन यंत्रणा, वैयक्तिक सुरक्षा या मुद्द्यांचा विचार करून तेथील सुरक्षाविषयक स्थितीचा आढावा घेण्यात आला. या यादीत २०१७ साली हाँगकाँग ९व्या क्रमांकावर होते. मात्र गेल्या दोन-तीन वर्षांपासून हाँगकाँगमध्ये काहीसे अस्थिर वातावरण आहे. एक महिन्यापूर्वीपासून या शहरात चीनी वर्चस्वाविरुद्ध आंदोलनाने उग्र स्वरूप धारण केले आहे.
इकॉनॉमिस्टच्या चमुने केलेल्या या यादीतील पहिल्या दहा शहरांमध्ये आशिया-पॅसिफिक शहरांचे वर्चस्व आहे. त्यामध्ये सिडनी, सेऊल, मेलबोर्न या शहरांचाही समावेश आहे. सर्वाधिक सुरक्षित असलेल्या पहिल्या दहा शहरांच्या क्रमवारीतून अॅमस्टरडॅम, कोपनहेगन, टोरँटो ही शहरे बाहेर फेकली गेली आहेत. लंडन, न्यूयॉर्क या शहरांनी अनुक्रमे १४ वे व १५ वे स्थान पटकाविले आहे.सर्वाधिक सुरक्षित शहरे या प्रकल्पाचे संपादक नाका कोंडो यांनी सांगितले की, या शहरांमधील नागरिकांकडे किती संपत्ती आहे, प्रत्येक स्तरावर तसेच कारभारामध्ये किती पारदर्शकता आहे या गोष्टींचीही बारकाईने तपासणी करण्यात आली. गेल्या वर्षीच्या यादीत वॉशिंग्टन शहर २३व्या क्रमांकावर होते. सर्वाधिक सुरक्षित असलेल्या शहरांमध्ये युरोपमधील पॅरिस, फ्रँकफर्ट, झुरिच, स्टॉकहोम या शहरांचा समावेश आहे. मात्र सॅन फ्रँन्सिस्को, लॉस एंजलिस, डल्लास या शहरांची क्रमवारीत घसरण झाली आहे.ढाका ५६ व्या, कराची ५७ व्या स्थानीच्पाकिस्तानमधील कराचीने या यादीत ५७ व्या क्रमांकाचे स्थान पटकावले असून दिल्लीपेक्षा ते शहर कमी सुरक्षित आहे. बांगलादेशचे ढाका शहर ५६ व्या क्रमांकावर आहे.आशिया-पॅसिफिक देशांमध्ये म्हणावी तितकी डिजिटल सुरक्षा नाही असे इकॉनॉमिस्ट साप्ताहिकाच्या चमूने ही यादी तयार करताना म्हटले आहे.