ऑनलाइन लोकमत
लॉस एंजिलिस, दि. 15 - सेल्फी काढण्यामुळे होणारे आजार, त्याचे तोटे याबद्दल आपण अनेकदा ऐकलं आहे. पण सेल्फी काढल्याचा फायदादेखील होतो असं युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासात समोर आलं आहे. स्मार्टफोनवर सेल्फी काढून आपल्या मित्रांसोबत शेअर करणे आपल्याला आनंदी बनवू शकते असं या अभ्यासात दिसून आलं आहे. दररोज वेगवेगळ्या पद्धतीने सेल्फी काढून इतरांसोबत शेअर करणे आपल्यावर सकारात्मक प्रभाव पाडू शकतं असं या अभ्यासात स्पष्ट झालं आहे.
संशोधनमध्ये 28 मुली आणि 13 मुलांनी सहभाग घेतला होता. त्यांच्या दिवसभरातील हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यात आलं. चार आठवडे हे संशोधन करण्यात आलं. त्यानंतर काढण्यात आलेल्या निष्कर्षानुसार स्मार्टफोनवरुन सेल्फी घेणे आणि शेअर करण्याने सकारात्मक विचारांमध्ये वाढ होते असं समोर आल्याचं कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीचे पोस्ट डॉक्टरेट आणि लेखक यू चेन यांनी सांगितलं आहे.
सेल्फी काढण्यावरुन हा अंदाज कसा काय लावला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तुमच्या माहितीसाठी संशोधकांनी सेल्फी घेण्यासाठी एका अॅपचा वापर केला होता. विशेष म्हणजे या अॅपच्या माध्यमातून सेल्फी काढणा-या व्यक्तीच्या मानसिक स्थितीबद्दल माहिती मिळते. संशोधकांनी सर्व विद्यार्थ्यांची माहिती संकलीत केली आणि त्यानंतरच सेल्फी काढून शेअर करणे आपल्याला आनंदी ठेवते हा निष्कर्ष काढला आहे. .