इस्लामाबाद - कोरोनाच्या संकट काळात सुद्धा पाकिस्तान आपले नापाक कृत्य करतच आहे. यावेळी इलाहाबादमध्ये भारताचे वरिष्ठ राजदूत गौरव अहुवालिया यांच्या घराबाहेर पाकिस्तानमधील गुप्तचर यंत्रणा इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंसने (आयएसआय) कार आणि दुचाकीसह काही जण तैनात केल्याचे दिसून आले आहे.
याचबरोबर, गौरव अहलुवालिया यांना आयएसआयकडून धमकावण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. तसेच, गौरव अहलुवालिया यांचा दुचाकीवरून पाठलागही करण्यात आल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. एएनआयने यासंदर्भातील हा व्हिडीओ जारी केला आहे. यामध्ये गौरव अहलुवालिया यांच्या कारचा पाठलाग एक आयएसआय एजंट करत आहे.
ही घटना २ जून रोजी घडली आहे. ज्यावेळी अशाप्रकारे गौरव अहलुवालिया यांना भीती दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, अहलुवालिया आपल्या घराबाहेर जात असताना आयएसआयचे एजंट त्याठिकाणी कार व दुचाकी घेऊन उभे होते आणि नंतर त्यांचा पाठलाग सुरू केला. याआधीही गौरव अहुवालिया यांना असाच त्रास देण्यात आला होता.
दरम्यान, या घडलेल्या प्रकारबद्दल भारतीय दुतवासाने चिंता व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानी दुतावासात काम करणारे दोन अधिकारी हेरगिरी करताना रंगेहात पकडले. भारताच्या गुप्तचर यंत्रणांनी त्यांनी ताब्यात घेतले. त्यामुळे गौरव अहुवालिया यांना त्रास दिला जात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.