न्यू यॉर्क- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे शासक किम जोंग उन यांची 12 जून रोजी सिंगापूर येथे भेट होणार आहे. दोन्ही नेत्यांनी गेल्या वर्षभरात एकमेकांना विविध प्रकारची आव्हाने दिली होती तसेच टीकाही केली होती. मात्र हा तणाव निवळण्याच्या दिशेने आता दोन्ही नेत्यांची वाटचाल सुरु आहे.या सिंगापूरमधील बैठकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर कोरियासह विविध देशांनी आपापल्या हालचाली सुरु केल्या आहेत. उत्तर कोरियात रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जे लॅव्रोव गेले आहेत तर बुधवारी रात्री उत्तर कोरियाचे काही उच्चपदस्थ अधिकारी अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट माईक पोम्पेओ यांची भेट घेतली. या भेटीमध्ये उत्तर कोरियाचे नेते किम योंग चोल यांचाही समावेश होता. किम योंग चोल हे किम जोंग उन याचे उजवा हात मानले जातात. तसेच गेल्या 18 वर्षांमध्ये अमेरिकेत जाणारे ते सर्वात उच्चपदस्थ वरिष्ठ नेते आहेत. मॅनहॅटन येथे पोम्पेओ यांच्यासोबत त्यांनी जेवण घेतले आणि अर्धा तास चर्चा केली.
आज गुरुवारीही त्यांच्या दोन बैठका होणार आहेत. गेल्या महिन्यात उत्तर कोरियाचे शासक किम जोंग उन आणि दक्षिण कोरियाचे पंतप्रधान मून जाए इन यांची भेट झाली होती. सुमारे 50 वर्षांचा शीतयुद्धाचा काळ दोन्ही देशांनी अनुभवल्यानंतर त्यांच्यामध्ये झालेली ही भेट जागतिक शांततेसाठी महत्त्वाची मानली जाते. या दोन्ही देशांच्या नेत्यांनी आगामी काळामध्ये कोरिया द्वीपकल्पावरुन अण्वस्त्रे नष्ट करण्याचा मनोदय व्यक्त केला आणि त्या दिशेने प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते. याबरोबरच उत्तर कोरियाने आपण नष्ट करत असलेल्या अणूप्रकल्पाच्या स्थळा भेट देण्याची परदेशी पत्रकारांना परवानगीही दिली.