कोलकाता - डोकलामचा विषय आता मागे राहिला असून चीन आणि भारत एकत्र काम करत आपले संबंध अजून मजबूत करत असल्याचं चीनचे काऊन्सिल जनरल बोलले आहेत. चीनचे काऊन्सिल जनरल झनवू यांनी एकमेकांना सहकार्य करण्यावर भर दिला जात असल्याचंही सांगितलं आहे. 'भारत आणि चीन एकत्र काम करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जीनपिंग यांच्यात 5 सप्टेंबर झालेल्या बैठकीत संबंध अजून मजबूत कसे करता येतील यावर चर्चा झाली', अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. पिपल्स रिपब्लिक ऑफ चीनच्या आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
'जोपर्यंत दोन्ही देश एकत्र काम करतील तोपर्यंत सहकार्य आणि विकासावर भर देणं सोपं जाईल', असा विश्वास झनवू यांनी व्यक्त केला आहे. दोन्ही देशांनी डोकलमाचा वाद मागे सोडला आहे का असं विचारलं असता , 'हो आम्ही तो मुद्दा मागेच सोडला असून द्विपक्षीय संबंध पुढे नेण्यासाठी काम करत आहोत', असं सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जीनपिंग यांची 5 सप्टेंबर रोजी ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने भेट झाली होती. यावेळी दोन्ही देशांनी सुरक्षेच्या दृष्टीने एकमेकांना सहकार्य करण्याची गरज असून, डोकलामसारखा वाद पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न केला पाहिजे यावर दोन्ही नेत्यांचं एकमत झालं होतं.
16 जून रोजी चिनी लष्करानं सिक्कीम सेक्टरमधील डोकलाम येथे रस्ता बांधण्यास सुरुवात केली होती. त्यांचं हे अतिक्रमण थोपवण्यासाठी भूताननं भारताची मदत मागितली होती. त्यानंतर, भारतीय लष्कर त्यांच्या मदतीला धावून गेलं होतं. चीनच्या रस्ताबांधणीला भारताने विरोध केल्यानंतर वादाला सुरुवात झाली होती.
28 ऑगस्ट रोजी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने भारत आणि चीन आपापसातील सहमतीने सैन्य मागे घेण्यास तयार असल्याचं जाहीर केलं होतं.
काय होता डोकलामचा वाद?चीननं चुंबी खोऱ्यातल्या याटुंग आणि डोकलाममध्ये रस्ते बांधण्याचं काम हाती घेतलं, या कामाला भारतानं कडाडून विरोध दर्शविला, मात्र या विरोधाकडे चीननं सपशेल दुर्लक्ष केलं, ज्यानंतर भारतानं लक्ष ठेवण्यासाठी बंकर उभारले, भारतानं उभारलेले दोन बंकर चिनी सैन्यानं उद्ध्वस्त केले. या कारवाईनंतर भारतानं आपल्या लष्कराची एक मोठी तुकडी या भागात तैनात केली आणि नेमक्या याच कारणावरून दोन्ही देशांमध्ये तणाव चांगलाच वाढला.