अमेरिकेमधील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान एका माजी मॉडेलने रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सनसनाटी आरोप केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी १९९३ मध्ये माझ्यासोबत छेडछाड केली होती, असा आरोप तिने केला आहे. ९० च्या दशकात एक व्यावसायिक मॉडेल म्हणून काम करणाऱ्या स्टेसी विल्यम्स हिने हा आरोप केला आहे. तिने सांगितले की, मी जेफ्री एपस्टीन याच्या माध्यमातून डोनाल्ड ट्रम्प यांना भेटले होते. ही घटना न्यूयॉर्कमधील ट्रम्प टॉवरमध्ये घडली होती. ही घटना म्हणजे ट्रम्प आणि एपस्टीन यांच्यातील विकृत खेळ होता, असा आरोप तिने केला. दरम्यान, एपस्टीन याने २०१९ मध्ये तुरुंगात जीवन संपवलं होतं.
पेनिसिल्वानियामधील रहिवाशी असलेल्या ५६ वर्षीय स्टेसी विल्यम्स हिने सर्वाइव्हर्स फॉर कमला, नावाच्या एका गटाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात या घटनेचा गौप्यस्फोट केला. हा गट २०२४ च्या अध्यक्षीय निवडणुकीत कमला हॅरिस यांना पाठिंबा देत आहे. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हे आरोप फेटाळून लावण्यात आले आहेत. हए आरोप खोटे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच हे आरोप प्रतिस्पर्धी उमेदवार कमला हॅरिस यांच्या प्रचार मोहिमेच्या माध्यमातून रचण्यात आले आहेत, असा दावा त्यांनी केला.
द गार्डियनच्या एका रिपोर्टनुसार विल्यम्स हिने सांगितले की, १९९२ मध्ये एका ख्रिसमस पार्टीमध्ये मी डोनाल्ड ट्रम्प यांना भेटले होते. तेव्हा एपस्टिनने माझी त्यांच्याशी भेट घालून दिली होती. काही महिन्यांनंतर एपस्टिनने मी ट्रम्प टॉवरमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटावं, असा सल्ला दिला. तेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी माझं जोरदार स्वागत केलं. मात्र त्यानंतर ते मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करू लागले. त्यानंतर मी अस्वस्थ झाले आणि ट्रम्प टॉवरमधून बाहेर पडले, असे विल्यम्स हिने सांगितले.