ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 29 - पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्त्रायलचा दौरा करणारे पहिले भारतीय पंतप्रधान असणार आहेत. मोदींच्या या दौ-यावरुन इस्त्रायलमधील प्रसारमाध्यमांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. तेथील प्रसारमाध्यमं मोदींच्या या दौ-याला प्रचंड महत्व देत आहे. इस्त्रायलमधील वृत्तपत्र "द मार्कर"ने मोदींचा जगातील सर्वात महत्वाचे पंतप्रधान म्हणून उल्लेख केला आहे. वृत्तपत्राने आपल्या एका लेखात "जागे व्हा, जगातील सर्वात महत्वाचे पंतप्रधान येत आहेत" असं म्हटलं आहे.
हिब्रू भाषेत असलेल्या या वृत्तपत्राने आपल्या लेखात भारत आणि इस्त्रायलमधील संबंधावर भाष्य केलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनीदेखील इस्त्रायलचा दौरा केला होता, मात्र वृत्तपत्राने त्यासंबंधी जास्त लिहिलेलं नाही. 125 कोटी लोकसंख्या असलेल्या देशाच्या पंतप्रधानांकडे लक्ष दिलं पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे. इस्त्रायलमधील प्रसारमाध्यमांमध्ये मोदींच्या दौ-यावरुन चर्चासत्र रंगली आहेत.
मोदींनी रामाल्लाह येथे न जाता फक्त इस्त्रायलचा दौरा करण्यावर भर देण्याच्या मुद्दा येथील प्रसारमाध्यमांसाठी खूपच सकारात्मक ठरत आहे. रामाल्लाह पॅलेस्टाईनमधील एक शहर आहे. इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनदरम्यान वाद सुरु असताना मोदींनी फक्त इस्त्रायलवर लक्ष्य केंद्रिय करणं एक महत्वाचा संकेत मानला जात आहे.
"द मार्कर"ने पुढे लिहिलं आहे की, ""जगातील इतर राष्ट्रप्रमुखांपेक्षा वेगळी भूमिका घेत मोदींनी रामाल्लाहचा दौरा करण्यास नकार दिला. मोदी आपल्या दौ-यात पॅलेस्टाइनच्या महमूद अब्बास किंवा अन्य नेत्यांचीही भेट घेणार नाहीत. आम्ही जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा अनुभव घेणार आहे. भारत जगातील दुस-या क्रमांकाचा मोठा देश आहे". विशेष म्हणजे याचवर्षी मे महिन्यात महमूद अब्बास भारत भेटीवर आले होते. तसंच 2015 मध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी पश्चिम आशिया दौरा करताना पॅलेस्टाईनला भेट दिली होती. यावेळी त्यांनी महमूद अब्बास यांचीही भेट घेतली होती.
याआधी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्ताने इस्त्रायलमध्ये अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रसारमाध्यमांनीही त्यांचं चांगल्या प्रकारे कव्हरजे केलं होतं. इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी गेल्याच आठवड्यात मोदींच्या दौ-यावरुन आनंद व्यक्त करत मोदींना आपला मित्र म्हटलं होतं. बेंजामिन नेतन्याहू बोलले होते की, ""पुढील आठवड्यात भारताचे पंतप्रधान आणि माझे मित्र नरेंद्र मोदी इस्त्रायलला येत आहेत. हा एक ऐतिहासिक दौरा असेल. भारताच्या स्वातंत्र्यापासून 70 वर्षात एकाही पंतप्रधानाने इस्त्रायलचा दौरा केलेला नाही. या दौ-यामुळे दोन्ही देशांमधील संबंध अजून मजबूत करण्यास मदत मिळेल".