मोदी यांनी त्यांच्या संयुक्त अरब अमिरात (यूएई) दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी कार्बन उत्सर्जन नसलेल्या अनोख्या मसदर शहरात फेरफटका मारून तेथील नूतनीकरण ऊर्जा व स्वच्छ तंत्रज्ञानाच्या वापराचा आढावा घेतला. पंतप्रधानांनी झीरो कार्बन मसदर स्मार्ट सिटीमध्ये एक तास व्यतित केला. यादरम्यान शहर प्रशासनातील अधिकाऱ्यांनी त्यांना शहराच्या विविध पैलूंची माहिती दिली. नूतनीकरण उर्जेवर आधारित व विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सर्जनशील संगमातून साकारलेले हे शहर देशाची राजधानी अबुधाबीपासून १७ कि. मी. अंतरावर आहे. मसदर स्मार्ट सिटी पाहून पंतप्रधान एवढे प्रभावित झाले की, त्यांनी शहराच्या अभिप्राय पुस्तिकेमध्ये ‘विज्ञान जीवन आहे’, असा संदेश डिजिटली लिहिला. मोदींनी या शहराच्या निर्मितीशी संबंधित पैलू जाणून घेण्यात विशेष रस दाखविला. नगरविकास आणि पुढील पिढींच्या नागरी अवकाशांबाबत मसदर शहरांत चर्चा करत आहे, असे टष्ट्वीट मोदींनी यावेळी केले. पंतप्रधानांनी मसदर शहरात स्वयंचलित कारमधून फेरफटका मारला.मोदी यांनी रविवारी ऐतिहासिक शेख झायेद मशिदीला भेट देऊन आपल्या दोनदिवसीय युएई दौऱ्याचा प्रारंभ केला. यानंतर मोदींनी तेथील भारतीय कामगारांची भेट घेतली. मोदी जवळपास ४० मिनिटे मशिदीत होते. ही मशीद जगातील तिसरी सर्वांत मोठी मशीद आहे. इस्लामिक स्थापत्य शास्त्रातील उत्कृष्ट नमुना असलेली ही मशीद उभारण्यासाठी ५४५ दशलक्ष डॉलर एवढा खर्च आला आहे. प्रार्थनेच्या या भव्य स्थळाला भेट देऊन आपणास आत्यंतिक आनंद झाला. या स्थळाचा आकार आणि सौंदर्य मन भारावून टाकते. मोदी यांनी सोमवारी संयुक्त अरब अमिरातीचे (यूएई ) युवराज शेख मोहंमद बिन जायेद अल नह्यान यांच्याशी चर्चा केली. यावेळी उभय पक्षांनी दहशतवादविरोधी लढाई, सुरक्षा, व्यापार व परस्पर संबंध व्यूहात्मक पातळीपर्यंत वृद्धिंगत करण्याबाबत विचारविनिमय केला. जायेद अल नह्यान यूएईच्या सुरक्षा दलाचे सर्वोच्च उपकमांडर आहेत. द्विपक्षीय मुद्यांशिवाय दोन्ही नेत्यांनी प्रदेशाची स्थिती, विशेष करून इस्लामिक स्टेट दहशतवादी संघटना, तसेच विविध स्रोतांपासून उद्भवणाऱ्या दहशतवादाच्या धोक्याबाबत चर्चा केली. अमिरात पॅलेस हॉटेलमध्ये झालेल्या या चर्चेदरम्यान दोन्ही देशांनी परस्पर संबंध अधिक व्यापक करणे, तसेच आर्थिक सहकार्य वाढविण्याबाबत चर्चा केली. मोदी याच हॉटेलमध्ये थांबलेले आहेत. चर्चेनंतर युवराज नह्यान यांनी मोदींच्या सन्मानार्थ मेजवानीचे आयोजन केले. मोदी ३४ वर्षानंतर यूएईच्या दौऱ्यावर आलेले पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. यापूर्वीच्या सरकारांकडून आपणास ढिसाळपणाचा वारसा मिळाला असल्याचे वक्तव्य परदेशी भूमीवर केल्याबद्दल काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सोमवारी घणाघाती टीका केली. देशांतर्गत राजकारणाचा विषय परदेशी भूमीवर उपस्थित न करण्याचा सल्लाही काँग्रेसने मोदींना दिला.भोपाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातमधील मशिदीला भेट देण्याआधी आपल्याच देशातील एखाद्या मशिदीला भेट दिली असती तर बरे झाले असते, असे प्रतिपादन अखिल भारतीय मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डचे (एआयएमपीएलबी) कार्यकारी सरचिटणीस मौलाना मोहम्मद वली रहमानी यांनी म्हटले आहे.
मसदर सिटीत फेरफटका
By admin | Published: August 17, 2015 11:45 PM