ट्रेस, ट्रॅक, टर्मिनेट, रशिया-युक्रेन युद्धातून धडा घेत चीन बनवतोय खतरनाक हत्यार, अमेरिकेची झोप उडाली, भारताची चिंता वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 06:19 PM2022-06-07T18:19:33+5:302022-06-07T18:20:56+5:30
China News: रशिया आणि युक्रेन यांच्यात तीन महिन्यांपासून लांबलेल्या युद्धापासून चीनने चांगलाच धडा घेतला आहे. तज्ज्ञांच्या मते चीन येणाऱ्या दिवसांमध्ये अत्याधुनिक ड्रोन सिस्टिम विकसित करण्यावर वेगाने काम करत आहे.
बीजिंग - एक छोटंसं ड्रोन एखाद्या बड्या लष्करी अधिकाऱ्याच्या गाडीवर गुपचूपपणे लक्ष्य साधतं आणि ती गाडी स्फोट होऊन उडते आणि त्यातील सर्व लोक मारले जातात. त्यानंतर काही सेकंदांमध्येच संपूर्ण जगाला या हल्ल्याचं व्हिडीओ चित्रिकरण त्या अधिकाऱ्यांच्या फोटोंसह मिळतं. असं दृश्य एखाद्या सायन्स फिक्शनमधी असल्याचं वाटू शकतं, पण हे आता सत्यात उतरू शकतं.
अशा हल्ल्यामुळे शत्रुसैन्य आणि त्या देशाच्या मनोधैर्याला मोठा धक्का बसू शकतो. रशिया आणि युक्रेन यांच्यातील हल्ल्याची बारकाईने पाहणी करत असलेल्या चीनने आता आपल्या सैन्यासाठी असेच स्मार्ट ड्रोन विकसित करण्याची तयारी केली आहे. हे ड्रोन आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना ट्रॅक करेल आणि नंतर त्यांची हत्या करेल.
रशिया आणि युक्रेन यांच्यात तीन महिन्यांपासून लांबलेल्या युद्धापासून चीनने चांगलाच धडा घेतला आहे. या युद्धात महासत्ता असलेल्या रशियाला किरकोळ युक्रेनने कडवी झुंज दिली आहे. युक्रेनच्या सैन्यबलामध्ये सर्वात मोठा वाटा हा त्यांना तुर्की आणि अमेरिकेकडून मिळालेल्या ड्रोनचा आहे.
युद्धाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये जेव्हा रशिया आणि युक्रेनची लढाऊ विमानं जेव्हा आमने-सामने याचची तेव्हा अमेरिकी ड्रोन रशियन विमानांवर लक्ष ठेवायचे आणि त्याची अचूक माहिती युक्रेनला द्यायचे. त्यामुळे युक्रेनला अचूक हल्ले करणे शक्य झाले. यादरम्यान ड्रोनच्या मदतीने युक्रेनने अनेक बड्या कमांडर्सना वेचून वेचून ठार केले.
दरम्यान, चीन सध्या तैवानसोबतच्या विवादामुळे तणावाच्या स्थितीमध्ये आहे. तसेच तैवानसोबत संघर्षाला तोंड फुटल्यास अमेरिका लष्करी हस्तक्षेप करेल, अशी चीनला शंका आहे. दरम्यान, रशियन सैन्याला होत असलेल्या लक्षणीय नुकसानामुळे चीन सावध झाला असून, परिस्थितीचं आकलन करत आहे. तसेच आपलं नुकसान टाळण्यासाठी चीन सावधपणे पावलं उचलत आहे.
तज्ज्ञांच्या मते चीन येणाऱ्या दिवसांमध्ये अत्याधुनिक ड्रोन सिस्टिम विकसित करण्यावर वेगाने काम करत आहे. सध्या चीनकडे जे ड्रोन आहेत, त्यांच्यामाध्यमातून युक्रेनच्या सैन्याने अमेरिकेच्या मदतीने रशियाविरोधात केली त्याप्रमाणे कारवाई करता येत नाही. त्यामुळे चीन असे ड्रोन विकसित करण्यावर काम करत आहे. जे सोशल मीडियावरील फोटोच्या आधारावर त्वरित कुठल्याही अधिकाऱ्याला ओळखू शकेल. तसेच त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवू शकेल.
चीन आपली ही उणीव दूर करण्यासाठी प्रयत्नशील आहे, तसेच असे ड्रोन विकसिक करण्याचा प्रयत्न करत आहे ज्याच्या माध्यमातून शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवता येईल. तसेच शत्रूवर त्वरित हल्ला करता येईल, ज्यामुळे युद्ध हे कमीत कमी वेळात पूर्ण यशासह संपवता येईल. चीनच्या या चालीमुळे गेल्या काही काळापासून लडाखसह इतर ठिकाणी सुरू असलेल्या तणावामुळे भारताचीही चिंता वाढणार आहे.