वॉशिंग्टन, दि. 9 - सॅन फ्रांसिस्कोच्या बे एरिया रेडिओ जिंदगी गणेशोत्सव २०१७ हा तीन दिवसाचा महासोहळा ग्रेट अमेरिका पार्कमध्ये सांता क्लारा गावात अतिशय धुमधड्याकात पार पडला. या सोहळ्यात लेझीम,ढोल-ताशे आणि गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरयाच्या गजरात १५ फुटी गणपतीचे अतिशय उत्साहात बे एरियातील अनिवासी भारतीय लोकांनी स्वागत केले.
पं. विलास ठुसे यांच्या मार्गदर्शनाखाली या गणरायाची स्थापना झाली. यावर्षीचा येथील बाप्पा मोराच्या देखाव्यात, रंगसंगतीत आणि सजावटीत रंगला. रोज ३ वेळेस आरती, अथर्वशीर्ष, मंत्र पुष्पांजली, मोरया मोरयाचा गजर आणि बाप्पाला खुश करण्यासाठी लाडू, तळळेले आणि उकडीच्या मोदकचा नैवेद्य असा जामानिमा होता.
बुद्धी आणि कलेच्या या देवतेसमोर ६५० हून अधिक स्थानिक कलाकारांनी गायन, वादन, नाटक आणि नृत्य सादर केले. शास्त्रीय नृत्यात भरतनाट्यम, कथक, ओडिसी, कुचिपुडी ते शास्त्रीय-उपशास्त्रीय नवीन स्टाईलचे फ्युजन नृत्य, ढिनच्यॅक डान्स नंबर्स म्हणजे बॉलीवूडची हिंदी गाणी आणि प्रांतीय-भाषिक गाण्यांवरती नृत्याविष्कार सादर करण्यात आले.
स्पार्टन ग्रुप ऑफ लेझीम हे येथील गणेशोत्सवातील एक प्रमुख आकर्षण होते. त्यांच्या धमाकेदार आणि जोशपूर्ण लेझीमने बे एरियातल्या इतर प्रान्तीय लोकांनाही वेड लावले.
शुक्रवार संध्याकाळ रंगली ती लोकप्रिय गाण्यांनी आणि लोककला नृत्यांनी. पंजाब, ओरिसा, काश्मीर, राजस्थान, प. बंगाल आणि महाराष्ट्रातील कलाकारांनी आपापल्या भाषेतील गाणी आणि लोककलांचा नृत्याविष्कार सादर केला.
आदित्य पटेल यांच्या नृत्य दिग्दर्शनाखाली ७५ मुलांच्या समूह नृत्याने शनिवारची संध्याकाळ स्मरणीय ठरली तर रंगमंच थिएटरच्या शेड्स आॅफ महाराष्ट्रातल्या नृत्यांनी ग्रेट अमेरिका पार्क रविवारी दणाणून सोडला.
विविध प्रकारच्या खाण्यांचे स्टॉल्स, भारतीय कपडे, दागिने, वस्तू यांचे स्टॉल्स, झेंडूच्या फुलांच्या माळा, कमानी, रंगीबेरंगी पताका यांनी सगळ्या गणेश उत्सवाला मेळ्याचे स्वरूप आलेले. १००हून अधिक डिग्री तापमान असून देखील ४०,००० वर लोकांची या सोहळ्याला उपस्थिती होती. अनिवासी भारतीय आपली संस्कृती जपण्याचा, परंपरा पुढच्या पिढीत पोचावी यासाठी अतोनात प्रयत्न करत असल्याचे यातून दिसून आले.
गेल्या ६ महिन्यांपासून या गणेश उत्सवाची तयारी चालू होती. रेडिओ जिंदगीचे मालक नीरज धर आणि प्रवीण सुग्गला गेल्या तीन वर्षांपासून हा गणेश उत्सव बे एरियातल्या भारतीय लोकांसाठी साजरा करीत आहेत. त्यांना नीरा धर, सेहबा शाह, तारेश, अंकित शाह, डी. जे. डॅनियल, इरा नाईक, सनी मोझा, विशाल कपूर, सुनीता राज सौम्या महासेठ, मायकल चांद, याशिका अहुजा, चिंतन सोढा, मनोज सुधाकर, ख्याती ब्रह्मभट्ट, अंकिता आर्य, मीनल उगले तसेच अमित - रेणुका इनामदार यांनी साथ देत दिली.
पं. प्रवीण कुलकर्णी यांनी उत्तरपूजा केल्यानंतर, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या आणि गणपती बाप्पा मोरया, अगले बरस तू जल्दी आ अशा भावपूर्ण घोषणात, लाडक्या गणरायाची विसर्जन मिरवणूक निघाली ती थेट हाफ मून बे येथून. भर समुद्रात मध्यभागी लाडक्या गणरायाला निरोप देतांना या अनिवासी भारतीय भाविकांना अश्रू आवरले नाहीत.