वॉशिंग्टन : मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्यांना प्रशिक्षण देण्याचे काम पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआयमधून निवृत्त झालेल्या काही जणांनी केले होते हे आयएसआयच्या तत्कालीन प्रमुखांनी कबूल केले होते; परंतु त्यांच्यावर कारवाई करण्यास त्यांनी नकार दिला होता. ही माहिती अमेरिकेची गुप्तहेर संघटना सीआयएचे माजी संचालक मायकेल हेडेन यांनी त्यांच्या ‘प्लेर्इंग टू द एज’ या पुस्तकात दिली. मुंबई हल्ल्याचा संदर्भ घेऊन हेडन म्हणाले की, त्यात पाकिस्तानचा हात अगदी स्पष्ट होता. या हल्ल्याच्या अगदी तळाशी जा व आमच्याशी मोकळेपणाने चर्चा करा, असे मी आयएसआयचे प्रमुख अहमद शुजा पाशा यांना फोनवर सतत सांगत असे. २६/११ चा हल्ला हा लष्कर ए तोयबाचा होता यात आम्हाला कोणतीही शंका नव्हती व त्या हल्ल्यासाठीची तयारी आणि मार्गदर्शन पाकिस्तानातून होत होते याचे भक्कम पुरावे होते. शुजा पाशा हे पाकिस्तानी लष्कराच्या कारवायांचे माजी संचालक होते. पाशा हे आयएसआयचे काही आठवड्यांपूर्वीच प्रमुख बनले आहेत. त्यांना गुप्तचरांच्या कामाचा काहीही अनुभव नाही. पाशा नाताळच्या दिवशी माझ्या कार्यालयात आले आणि बराच वेळ ते माझ्यासोबत होते. पाशा यांनी केलेल्या चौकशीतून आयएसआयमधून निवृत्त झालेल्यांपैकी काही जण लष्कर ए तोयबात गुंतले असल्याचे स्पष्ट झाले. (वृत्तसंस्था)