बर्लिन- गेल्या काही दिवसांमध्ये भारतातील भ्रष्टाचार कमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मोदींच्या राज्यात म्हणजेच भारतात भ्रष्टाचार कमी झाल्याचा अहवाल आंतरराष्ट्रीय गैर सरकारी संस्था असलेल्या ट्रान्सपेरन्सी इंटरनॅशनलनं दिला आहे. मोदी सरकारनं भ्रष्टाचाराशी निपटण्यासाठी उचललेल्या पावलांना यश आल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. तसेच मोदींच्या या प्रयत्नांमुळे भारतातल्या भ्रष्टाचाराच्या क्रमांकातही सुधारणा झाली आहे. तसेच भारतापेक्षा शेजारील देश असलेल्या चीन आणि पाकिस्तानमध्ये जास्त भ्रष्टाचार असल्याचंही या रिपोर्टमधील अहवालातून उघड झालं आहे. ट्रान्सपेरन्सी इंटरनॅशनलच्या ग्लोबल करप्शन परसेप्शन इंडेक्स 2018नुसार, 180 देशांच्या यादीत भारत भ्रष्टाचाराच्या बाबतीत 78व्या स्थानी आहे. याच यादीत 2017मध्ये भारत 81व्या स्थानावर होता. 2011नंतर पहिल्यांदाच अमेरिका सर्वाधिक भ्रष्टाचारी असलेल्या 20 देशांच्या यादीतून बाहेर पडला आहे. 2018च्या अहवालानुसार 39 या अंकासह चीन भ्रष्टाचारात 87व्या क्रमांकावर आहे. तर 38 अंकांसह श्रीलंका आणि इंडोनेशिया 89व्या स्थानी आहे. 33 अंकांसह पाकिस्तान हा भ्रष्टाचारात 117व्या स्थानावर आहे. 31 अंकांसह नेपाळ आणि मालदीव हे 124व्या स्थानावर आहेत. 29 या आकड्यासह म्यानमार 132व्या स्थानी आहे. 28 अंकांसह इराण, मॅक्सिको आणि रशिया भ्रष्टाचाराच्या बाबतीत 138व्या स्थानी आहेत. 26 अंकांसह बांगलादेश 149व्या स्थानी आहे. 18 अंकांसह व्हेनेझ्युएला आणि इराक 168व्या स्थानी आहे. तर 16 अंकांसह अफगाणिस्तान 172व्या स्थानी आहे. 14 अंकांसह उत्तर कोरिया 176व्या स्थानी आहे.
- भारताला मिळाले 41 अंक
या अहवालातील निर्देशांकानुसार प्रत्येक देशाला एक निर्धारित अंक देण्यात आला आहे. यात शून्य अंक असलेला सर्वाधिक भ्रष्टाचार देश, तर 100 अंक असलेला भ्रष्टाचारमुक्त देश असल्याचं नमूद केलं आहे. या रिपोर्टमध्ये भारताला 41 अंक देण्यात आले आहेत. 2017 आणि 2016मध्ये भारताला 40 अंक होते, तर 2015मध्ये हाच अंक 38 होता.
- सोमालिया सर्वाधिक भ्रष्ट देश
सोमालियात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचं या रिपोर्टमधून समोर आलं आहे. सोमालियाला 10 अंक देण्यात आला असून, हा देश या यादीत 180व्या स्थानी आहे. यादीत 178 स्थानी दक्षिण सूडान आणि सीरिया आहे. यमन, उत्तर कोरिया, सूडान, गिनी बिसाऊ, इक्वेटोरियल गिनी, अफगाणिस्तान आणि लिबिया हे देशही भ्रष्टाचारात अग्रेसर आहेत.
- डेन्मॉर्क सर्वाधित चांगला देश
निर्देशांकानुसार डेन्मॉर्कला पहिला आकडा बहाल करण्यात आला आहे, त्याचा अंक 88 आहे. म्हणजेच 180 देशांमध्ये डेन्मॉर्कमध्ये सर्वात कमी भ्रष्टाचार आहे.