ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. १ - पाकिस्तानातील दहशतवादी संघटना आणि व्यक्तींवर निर्बंध आणण्यासाठी गुरुवारी अमेरिका आणि सौदी अरेबियाने हातमिळवणी केली. अमेरिका आणि सौदी अरेबियामधील करारानुसार पाकिस्तानातील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोएबावरही निर्बंध येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रियाध भेटीच्या काहीतास आधी हा निर्णय जाहीर झाला.
अलकायदा, तालिबान आणि लष्कर-ए-तोएबाचा निधी रोखून त्यांचे जाळे मोडण्यासाठी अमेरिका आणि सौदी अरेबिया संयुक्तपणे कारवाई करणार आहेत. अलकायदा, तालिबान आणि लष्कर-ए-तोएबाचा हिंसाचाराचा इतिहास आहे. त्यांनी अमेरिका आणि दक्षिण आशियातील आमच्या सहका-यांना त्रस्त केले आहे असे अमेरिकेने म्हटले आहे.
लष्कर-ए-तोएबाचा नावीद कामर,अब्दुल अझीझ नुरीस्तानी आणि मोहम्मद इजाज साफराश यांच्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. मुंबईवरील २६/11 दहशतवादी हल्ला लष्कर-ए-तोएबाने घडवून आणला होता. युरोपियन परिषदेसाठी बेल्जियममध्ये गेलेले मोदी अण्विक सुरक्षा परिषदेनंतर शुक्रवारी संध्याकाळी रियाधसाठी रवाना होणार आहेत.