न्यूयॉर्क : कोरोनाच्या साथीमुळे अमेरिकेत बळी पडलेल्यांची संख्या एक लाखाच्या जवळपास पोहोचली असतानाच, तेथील ‘न्यूयॉर्क टाइम्स’ या प्रख्यात वर्तमानपत्राने रविवार अंकाच्या पहिल्या पानावर एक हजार कोरोना बळींच्या मृत्यूची माहिती (डेथ नोटिसेस) प्रसिद्ध करून अशा सर्व अभागी जीवांना आगळी श्रद्धांजली वाहिली आहे.
कोरोनाने अमेरिकेत किती मोठा हाहाकार माजविला आहे, त्याची व्याप्ती समजण्यासाठी हजार लोकांच्या मृत्यूविषयीची माहिती पहिल्या पानावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या देशात कोरोनाने सर्वात मोठा तडाखा न्यूयॉर्कला दिला आहे. तेथील उद्योगधंद्यांनाही मोठा फटका बसला असून, बेकारीचे प्रमाण खूप वाढले आहे.
कोरोना साथीमुळे अमेरिकेची अर्थव्यवस्थाही डळमळीत झाली. या भीषण आपत्तीत अमेरिकेमध्ये १६ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली असून, ९८ हजारपेक्षा जास्त लोक मरण पावले आहेत. ही जीवितहानी भयंकर असल्याचे मत न्यूयॉर्क टाइम्सने व्यक्त केले आहे. कोरोनामध्ये बळी पडलेल्यांपैकी एक हजार लोकांची यादी पहिल्या पानावर प्रसिद्ध करून तिचा वाढावा आतील पानांमध्येही देण्यात आला आहे.
न्यूयॉर्क टाइम्सचे असिस्टंट ग्राफिक्स एडिटर सिमन लँडोन यांनी रविवारी लिहिलेल्या लेखात म्हटले आहे की, कोरोनाची साथ अमेरिकेत पसरल्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीचे न्यूयॉर्क टाइम्सने खूप सखोल वृत्तांकन केले होते. या साथीत जे मरण पावले ती न्यूयॉर्क टाइम्सच्या वाचकांसाठीही मोठी वैयक्तिक हानी होती. त्याचे गहिरेपण लक्षात घेऊन त्या सर्वांनाच श्रद्धांजली वाहण्यासाठी रविवार अंकाच्या पहिल्या पानाची मांडणी वेगळ्या पद्धतीने करायचा निर्णय न्यूयॉर्क टाइम्सच्या संपादकीय मंडळींनी घेतला. एक हजार जणांच्या मृत्यूची प्रसिद्ध केलेली माहिती (डेथ नोटिस) ही प्रातिनिधिक आहे. ती सर्वच कोरोना बळींना वाहिलेली आगळी श्रद्धांजली आहे.
विशेष पानाला टिष्ट्वटरवरही सलामी
न्यूयॉर्क टाइम्सने रविवारी सकाळी प्रसिद्ध व्हायच्या अंकाच्या पहिल्या पानाचे छायाचित्र शनिवारी दुपारीच टिष्ट्वटरवर झळकविले. त्यानंतर काही तासांतच या टिष्ट्वटवर ६१ हजार रिटिष्ट्वट झाली व ११६,०० लोकांनी हे छायाचित्र लाइक केले. सोमवारपासून अमेरिकेमध्ये उन्हाळ्याच्या मोसमाला सुरुवात होत असून, देशात काही ठिकाणी निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे कोरोना साथीचा दुसरा फेरा येण्याची भीती अमेरिकेत व्यक्त केली जात आहे.