ह्युस्टन : धार्मिक द्वेषातून ठार मारण्यात आलेले भारतीय अभियंता श्रीनिवास कुचिभोतला (३२) यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कान्सास शहरात हजारो लोक एकत्र जमले होते. ते शांतता मोर्च्यामध्ये सहभागी होते. मोर्च्यामध्ये सहभागी असलेल्यांच्या हाती छायाचित्रे आणि फलक होते. ते ‘आम्हाला शांतता हवी आहे’ ‘आमचे शांततेवर प्रेम आहे’‘ आमची मुले आम्हाला गमवायची नाहीत’, ‘ऐक्य हा समाजाचा भाग आहे’, अशा घोषणा ते देत होते. त्यापैकी अनेकांच्या हातात मेणबत्त्या होत्या व त्यांच्या हातातील फलकांवर ‘ द्वेषाच्या राजकारणाला आमचा पाठिंबा नाही,’ असे लिहिलेले होते. या मोर्चात आणि शांतता बैठकीत श्रीनिवासचे मित्र उपस्थित होते. २२ फेब्रुवारीच्या रात्री श्रीनिवास कुचिभोतला यांची गोळ््या घालून हत्या झाली तर या हल्ल्यात अलोक मदासनी हे त्यांचे मित्र जखमी झाले. मदासनी या बैठकीला कुबड्यांवर आला होते. हा गोळीबार झाला त्या रात्री अमेरिकन मारेकऱ्याशी वाद घालून हस्तक्षेप करणारे अमेरिकन आयन ग्रिलोट जखमी झाले. ग्रिलोट यांच्या बहिणी या मोर्चात सहभागी होत्या.अमेरिकन नौदलातून निवृत्त झालेल्या व्यक्तिने कान्सास शहरातील बारमध्ये केलेल्या गोळीबारात श्रीनिवास ठार झाले तर अलोक जखमी. गोळीबार करण्यापूर्वी हल्लेखोराने ‘माझ्या देशातून निघून जा’ आणि ‘दहशतवादी’ असे जोरजोरात ओरडून म्हटले होते. हल्लेखोराने बहुधा या दोघांना मध्यपूर्वेतील स्थलांतरीत समजले असावे.
श्रीनिवास कुचिभोतलांना कान्सासमध्ये श्रद्धांजली
By admin | Published: February 28, 2017 4:17 AM