इस्लामाबाद : पाकिस्तानमधील डॉन या प्रख्यात वृत्तवाहिनीवर रविवारी दुपारी अचानक भारताचा तिरंगा ध्वज फडकला व स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. त्यामुळे पाकिस्तानमध्ये प्रचंड खळबळ माजली. डॉन वृत्तवाहिनीची यंत्रणा हॅक करून हा प्रकार घडविण्यात आल्याची चर्चा आहे.
पाकिस्तान डॉन हे प्रख्यात वृत्तपत्र असून त्या समूहाची वृत्तवाहिनीदेखील आहे. त्या वाहिनीवर रविवारी नेहमीप्रमाणे बातम्यांचे प्रक्षेपण होत असताना दुपारी अचानक भारताचा राष्ट्रध्वज तिथे फडकला व स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. त्या दृश्याचा एक व्हिडिओ व छायाचित्र समाजमाध्यमांत झळकले आहे. त्यामुळे या प्रकरणाची आणखी उदंड चर्चा सुरू झाली. हे हॅकरचे कृत्य असल्याचा दावा पाकिस्तानातील काही जणांनी केला आहे. या प्रकरणाचा तपास सुुरू झाला आहे. त्यातून उघड झालेले सत्य आम्ही प्रेक्षकांसमोर मांडू, असे या वृत्तवाहिनीने म्हटले आहे.