इस्तंबूल : इस्तंबूलच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आलेल्या तिहेरी आत्मघाती हल्ल्यात ४१ ठार, तर २३९ जण जखमी झाले असून, मृतांत १८ विदेशी नागरिकांचा समावेश आहे. शहराच्या गव्हर्नर कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, २३९ जखमींपैकी १०९ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. मृतांत सौदी अरेबियाचे पाच व इराकच्या दोन जणांसह ट्युनिशिया, उझबेकिस्तान, चीन, इराण, युक्रेन आणि जॉर्डन येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारण्यासाठी कोणतीही संघटना पुढे आली नाही. मात्र, तुर्कीश प्रशासनाने इस्लामिक स्टेट अर्थात इसिसच्या जिहादींवर संशय व्यक्त केला आहे. विमानतळावरील हल्ला इसिसने घडवून आणल्याचे प्राथमिक संकेत आहेत, असे तुर्कीचे पंतप्रधान बिनाली यिलदिरीम यांनी सांगितले. ते घटनास्थळी पत्रकारांशी बोलत होते. पुरावे इसिसकडे अंगुलीनिर्देश करतात, असे ते म्हणाले. तुर्कीतील एकाही हल्ल्याची जबाबदारी इसिसने स्वीकारलेली नाही. मात्र, प्रशासनाने अंकारात आॅक्टोबर २०१५ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटासह अनेक हल्ल्यांसाठी इसिसकडे बोट दाखविले आहे. (वृत्तसंस्था)>दहशतवादाविरुद्ध लढ्याचे आवाहनतुर्कीचे राष्ट्राध्यक्ष तईप इरडोगान यांनी दहशतवादाविरुद्ध संयुक्त आंतरराष्ट्रीय लढ्याचे आवाहन केले. अमेरिकेसह तुर्कीच्या पाश्चात्त्य सहकाऱ्यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. >असा झाला हल्ला...इस्तंबूलच्या अतातुर्क विमानतळावर मंगळवारी आत्मघाती हल्ला झाला. हा तिहेरी हल्ला होता. दहशतवादी रात्री १० वाजता टॅक्सीने आले व स्वयंचलित बंदुकीद्वारे प्रवाशांवर अंदाधुंद गोळीबार करून नंतर त्यांनी स्वत:चा स्फोट घडवून आणला. हल्ल्यानंतर विमानतळावरील सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली. इस्तंबूलमध्ये यावर्षी आतापर्यंत चार हल्ले झाले असून, आजचा हल्ला हा सर्वात भयंकर हल्ला होता. इस्तंबूल हे तुर्कीतील सर्वात मोठे शहर आहे. दरम्यान, एकापाठोपाठ होत असलेल्या हल्ल्यांच्या दृष्टिकोनातून तुर्कीत अतिसतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.मृतांत भारतीय नाही या हल्ल्यात एकही भारतीय मृत्युमुखी पडल्याचे वृत्त नाही. भारतीय वकिलात इस्तंबूल प्रशासनाच्या संपर्कात असून, साहाय्याची गरज असलेल्या भारतीयांसाठी आपत्कालीन दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने सांगितले. मृतांत एकाही भारतीयाचा समावेश असल्याचे अद्याप वृत्त नाही. >हल्ल्याचे फुटेज व्हायरलसोशल मीडियावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज मोठ्या प्रमाणात शेअर केले गेले. यात दोन स्फोट कॅमेऱ्यात कैद होताना दिसतात. एका क्लिपमध्ये ‘टर्मिनल’ इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ आगीचा मोठा गोळा फुटल्याचे व भयभित प्रवासी इकडे-तिकडे सैरावैरा पळत असल्याचे दिसते.काळ्या कपड्यातील हल्लेखोर पळत इमारतीत घुसल्यानंतर पोलिसांची गोळी लागून जमिनीवर पडतो व त्यानंतर तो स्वत:चा स्फोट घडवून आणतो, असे दुसऱ्या क्लिपमध्ये दिसते. विमानतळावर गोळीबारामुळे खिडक्यांच्या फुटलेल्या काचा आणि प्रवासांचे सामान इतस्तत: पसरले असून, घटनास्थळी सहायक न्यायवैद्यक पथकासह शेकडो पोलीस व अग्निशमन कर्मचारी उपस्थित आहेत. हल्ल्याचा एक प्रत्यक्षदर्शी ओतफाह मोहंमद अब्दुल्ला यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, ‘कोणीतरी आला आणि त्याने आमच्यावर गोळीबार केला. त्यानंतर माझी बहीण तेथून पळून गेली. ती कोणत्या दिशेने गेली हे मला माहीत नाही. हल्लेखोर थांबेपर्यंत मी जमिनीवर पडून राहिलो. मी माझ्या बहिणीला शोधू शकत नाही.’>हल्ला अमानुष - मोदीतुर्कीतील हल्ल्याला अमानुष आणि भयंकर संबोधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा बुधवारी निषेध केला. इस्तांबूलमधील हल्ला अमानुष व भयंकर आहे. मी त्याचा तीव्र शब्दांत निषेध करतो. माझ्या सहवेदना मृतांच्या कुटुंबियांसोबत आहेत. जखमी लवकर बरे होवोत, अशी कामना करतो, असे टिष्ट्वट मोदींनी केले आहे.
इस्तंबूलच्या विमानतळावर तिहेरी हल्ला
By admin | Published: June 30, 2016 5:29 AM