ऑनलाइन लोकमत
यिचांग, दि. 02 - चीनमधील एका महिलेने गोंडस बाळाला जन्म दिल्यानंतर पुन्हा सहा दिवसानंतर दोन जुळ्या मुलींना जन्म दिल्याचे वृत्त आहे. अशा प्रकारे एखाद्या महिलेचं बाळंतपण दोनवेळा होण्याची दुर्मिळ घटना आहे.
येथील एका स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, यिचांग येथील एका महिलेनं 27 फेब्रुवारीला दोन जुळ्या मुलींनी जन्म दिला. त्याआधी तिनं 21 फेब्रुवारीला एका गोंडस बाळाला जन्म दिला होता. दरम्यान, या महिलेनं पहिल्यांदा 1.44 किलो वजनाच्या बाळाला जन्म दिल्यानंतर तिची प्रसुतीची प्रक्रिया थांबली. प्रसुतीची प्रक्रिया पूर्ण करण्यास अडथळेच निर्माण झाले. यामुळे तिच्या पोटात असणारी दोन जुळी अर्भकं तशीच ठेऊन डॉक्टरांनी तिचं बाळंतपण पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सहा दिवसांच्या कालावधीनंतर पुन्हा या महिलेनं दोन जुळ्या मुलींना जन्म दिला. सध्या तिन्ही मुलं अतिदक्षता विभागात ठेवण्यात आली असून महिला सुखरुप आहे.
दरम्यान, गेल्या वीस वर्षांत पहिल्यांदाच अशाप्रकारचे बाळंतपण करावं लागल्याची माहिती, या महिलेची प्रसूती करणा-या डॉक्टर चेन अईहुआ यांनी दिली.
(साभार - Chinanews.com)