ब्रुसेल्स : येथे झालेल्या बॉम्बस्फोटानंतर देशभरात व्यापक शोध मोहीम हाती घेण्यात आली असून अनेक ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या आहेत. पोलीस हेलिकॉप्टरमधून अनेक ठिकाणी गस्त घालत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका अपार्टमेंटमधून एक बॉम्ब, इसिसचा झेंडा आणि रासायनिक पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. येथील नागरिकांनी प्लेस डि ला बोर्स स्क्वायर येथे कँडललाईट मोर्चा काढला आणि देशाचा झेंडा फडकविला, तर सोशल मीडियावर हजारो नागरिकांनी आपल्या दु:खद भावना व्यक्त केल्या. बेल्जियमचे पंतप्रधान चार्ल्स मिशेल यांनी म्हटले आहे की, देशासाठी हा काळा दिवस आहे. पण, अशा हल्ल्यांपुढे देश झुकणार नाही. दरम्यान, देशात बुधवारपासून तीन दिवसांचा दुखवटा पाळण्यात येत आहे. संयुक्त राष्ट्राने केला निषेध इसिसकडून झालेल्या या हल्ल्याचा संयुक्त राष्ट्र संघाने तीव्र निषेध केला आहे. अतिरेकी संघटनांना होणारी आर्थिक मदत रोखण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. दरम्यान, यातील आरोपींना लवकरात लवकर न्यायाच्या कक्षेत आणण्याची मागणीही संयुक्त राष्ट्र प्रमुखांनी केली आहे. मंगळवारच्या या हल्ल्यात ३५ जण ठार झाले. भारतीय अमेरिकींकडून निषेध भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिकांनीही या हल्ल्याचा निषेध केला आहे. द असोसिएशन आॅफ इंडियन मुस्लिम्स आॅफ अमेरिका या संघटनेने आपला राग व्यक्त केला आहे. संस्थेचे कार्यकारी संचालक कलीम ख्वाजा यांनी पश्चिमी देशांना आवाहन केले आहे की, त्यांनी सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा वाढवावी. (वृत्तसंस्था)
बेल्जियममध्ये धाडसत्र; इसिसचा झेंडा जप्त
By admin | Published: March 24, 2016 12:50 AM